नगरच्या उड्डाणपुलावर पुन्हा अपघात , एका व्यक्तीने गमावले प्राण

शेअर करा

नगरच्या नेप्ती कांदा मार्केटमध्ये कांद्याचे लिलाव असल्याकारणाने  व्यापाऱ्याने कांदा खरेदी केला आणि हा कांदा ट्रकमध्ये भरून ट्रकचालक आणि क्लीनर असे दोघेजण नगर वरून छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने निघाले होते . उड्डाण पुलावरून जात असताना स्टेट बँक चौकाजवळ वळणावर ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि डिव्हायडरला ट्रक धडकून रस्त्यावर पलटी झाला याच दरम्यान एक मारुती वॅगन कार कायनेटिक चौकाकडे जात होती ती या अपघातात ट्रक खाली दबली गेली. 

अवघ्या काही मिनिटात तेथील वाहतूक विस्कळीत झाली आणि भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निसार शेख , पोलीस हवलदार दिवटे , पोलीस कॉन्स्टेबल काळे तात्काळ स्टेट बँक चौकात आले आणि अपघाताचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ नागरिकांच्या मदतीने ट्रक खाली दबलेल्या प्रवीण किसन काटे , साक्षी प्रवीण काटे आणि नवनाथ उदमले ( राहणार काळेवाडी हिवरे झरे तालुका नगर ) यांना रुग्णालयात दाखल केले. 

दरम्यानच्या काळात ट्रक खाली एक व्यक्ती दबलेला असल्याचे देखील त्यांच्या लक्षात आले त्यामुळे क्रेनच्या सहाय्याने ट्रक हलवला त्यावेळी शुभम रघुनाथ शिंदे ( वय 35 वर्ष राहणार दावलवाडी तालुका बदनापुर जिल्हा जालना ) हा जागीच ठार झालेला होता . त्याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलेला असून नगर शहरातील याच ठिकाणी याआधी देखील अनेकदा अपघात झालेले आहेत . शहरातील हे वळण उड्डाणपूल होण्याच्या आधीपासूनच धोकादायक होते मात्र उड्डाणपूल झाल्यानंतर देखील अशा स्वरूपाचे अपघात याच ठिकाणी होत आहेत.


शेअर करा