डझनभर कॅमेरामन सोबत घेऊन फिरणारे लोकप्रतिनिधी आहेत की टिकटॉक स्टार  ?

शेअर करा

नगर शहरातील सावेडी रोडवरील साई मिडास नावाच्या बिल्डिंगमध्ये लागलेल्या आगीत आतापर्यंत सुदैवाने जीवितहानी झालेली नसली तरी या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत .काही लोकप्रतिनिधींनी तिथे जाऊन महापालिका प्रशासनावर टीका केली मात्र दुर्दैवाने  याच अहमदनगर महापालिकेतील सर्वच अधिकारी संबंधित लोकप्रतिनिधीच्या बोटावर प्रशासक राज येण्याच्या आधीपासून नाचत आहेत आणि त्यानंतर ही परिस्थितीत काहीच बदल झालेला नाही. 

नगर शहरात ठिकठिकाणी पत्रा मार्केट उभी राहिलेली आहेत. महापालिकेची कुठलीही परवानगी असे गाळे उभारणाऱ्या व्यक्तींना दिली जात नाही त्यामुळे महापालिकेला देखील अशा स्वरूपाच्या पत्रा मार्केटपासून कागदोपत्री तरी कुठलेही उत्पन्न मिळत नाही पण काही लाचखोर कर्मचारी वरकमाई करतात ही बाबी वेगळी. साई मिडास येथील आग ही नगर शहरात प्रथमच लागलेली आग नसून याआधी तपोवन रोड , भिंगार ,  गुलमोहर रोडवरील पारिजात कॉर्नर येथे देखील अशाच स्वरूपाच्या आगी लागलेल्या आहेत मात्र त्या ठिकाणी पत्रा मार्केटमध्ये या दुर्घटना घडलेल्या होत्या.  महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कारवाईसाठी निर्बंध कोण करते आणि अवैध पद्धतीने पत्र मार्केट कुणी उभी केली आहेत हे एक तर जागेच्या मालकांना माहीत आणि महापालिकेला माहीत.. 

राहिला विषय रस्त्यांचा तर रस्त्यांच्या बाबतीत देखील अशीच परिस्थिती असून रस्त्यांचा पर्दाफाश अनेकदा अनेक इतर लोकप्रतिनिधींनी केलेला आहे मात्र त्यांच्यावरच गुन्हे दाखल करून आपल्या बगलबच्चांना ‘सुखरूप ‘ ठेवत कुठेच अडकून न देण्याचे पवित्र काम केले जात आहे . रस्त्याचे ठेकेदार कोण आहेत ? रस्त्याची कामे कोण करतो आणि किती टक्के हिस्सा कोणाला जातो अन अधिकारी त्यामध्ये किती कमवतात ? अशा फालतू प्रश्नांवर विचार करायला नगरकरांना वेळ नाही कारण सालाबाद प्रमाणे येणाऱ्या धार्मिक उत्सवात अशा गोष्टी विसरल्या जातात आणि चर्चा फक्त केलेल्या कार्याची अन मंडळासाठी वाटलेल्या पैशाची होते बाकी सेलिब्रिटी आणून नाचवणे पण त्यात आलं बरका.. 

शहरात दुर्घटना झाली कि महापालिका अधिकाऱ्यांच्या नावाने  टीका करणे ऐवजी संबंधित लोकप्रतिनिधीने आत्तापर्यंत कधीही ‘ महापालिकेच्या कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई करा किंवा त्याची बदली करा . नगर शहरात त्याला ठेवू नका ‘ अशा स्वरूपाची एकदाही मागणी केल्याचे निदान आमच्या कानावर तरी आलेले नाही यावरून हा सर्व खेळ केवळ नगरकरांच्या डोळ्यात धुळ फेकण्यासाठी असल्याचे सहज दिसून येते . तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो यामध्ये नगरकरांना नक्की मिळतंय काय ? याचा नगरकरांनी विचार करण्याची गरज आहे . 

नगर शहरात आज रस्त्याची परिस्थिती बिकट झालेली आहे.  ठिकठिकाणी वाढलेला कचरा त्यातून वाढलेली रोगराई आणि मोकाट कुत्र्यांची पैदास नगरकरांच्या जीवावर उठलेली आहे. उर्वरित कसर काही विशिष्ट व्यक्ती आपली जनावरे रस्त्यावर सोडून नागरिकांच्या अपघाताला निमंत्रण देतात तर शहरातील अनेक भागांमध्ये आजही नगरकरांना पुरेसे पाणी मिळत नाही .  केवळ एखादी दुर्घटना झाली तर तिथे देखील जाऊन भेटीचे फोटोसेशन करून ते फेसबुक ट्विटर युट्युब वर व्हायरल करण्यासाठीच नगरकरांनी राजकीय नेतृत्वाला निवडलेले आहे का ? असा प्रश्न यामुळे पडल्याशिवाय राहत नाही. सतत अर्धा डझन कॅमेरामन सोबत घेऊन फिरणाऱ्या टिकटॉकर लोकप्रतिनिधीचा आता नगरकरांना उब आलेला आहे. मनपाचे जे अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाईसाठी आग्रहीपणा कधी दाखवणार ? हे ज्या दिवशी होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी म्हणता येईल अन्यथा नगरकरांनी लोकप्रतिनिधीला नव्हे तर एका टिकटॉककरला निवडून दिलंय असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.


शेअर करा