प्रेयसीवर घरात घुसून वार केल्यावर त्याने स्वतःच्या तोंडात ठेवला ‘ सुतळी बॉम्ब ‘ आणि ….

  • by

मुंबईत एका 55 वर्षीय प्रियकराने आपल्या 58 वर्षीय प्रेयसीच्या आईने घरात घेण्यास नकार दिला म्हणून रागाच्या भरात प्रियकराने आपल्या प्रेयसीवर घरात घुसून धारधार शस्त्राने गळ्यावर, चेहऱ्यांवर आणि अंगावर सपासप वार केले आणि या घटनेनंतर प्रियकराने स्वत: तोंडात सुतळी बॉम्ब फोडून घेतला. या धक्कादायक घटनेत प्रियकर आणि प्रेयसी दोघेही गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मुंबईतील कुरार विलेज येथील पुष्पा पार्कमध्ये ही धक्कादायक घटना घडली. या इमारतीत एक 58 वर्षीय महिला नवऱ्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर आपल्या 80 वर्षीय आई, 2 मुली आणि 1 मुलासोबत राहते. या महिलेचे 55 वर्षीय वाहनचालक सचिन चौहान यांच्याशी प्रेमसंबंध जुळले होते. जवळपास 15 वर्षांपासून दोघांचे हे प्रेमसंबंध सुरू आहे. त्यामुळे आरोपी सचिन यांचे महिलेच्या घरी येणे जाणे होते.

1 नोव्हेंबर रोजी सचिन आपल्या प्रेयसीला भेटायला आला होता. तेव्हा त्या महिलेच्या आईने सचिनला घरात घेण्यास नकार दिला. त्यामुळे सचिनसोबत त्या महिलेचे आणि तिच्या आईचे कडाक्याचे भांडण झाले. नंतर 15 नोव्हेंबरच्या दिवशी सकाळी 7 वाजता ती महिला कामाला जाण्यासाठी निघाली होती, तेव्हा सचिन तिथे पोहोचला. त्यामुळे पुन्हा सचिन आणि महिलेमध्ये कडाक्याचे भांडण झाले. भांडण सुरू असतानाच सचिनने आपल्यासोबत आणलेल्या चाकूने महिलेच्या गळ्यावर, चेहऱ्यांवर आणि अंगावर सपासप वार केले. एवढंच नाही तर क्रुरपणे महिलेचे केस देखील चाकूने कापले.

रागाच्या भरात आपल्या प्रेयसीवर चाकूने हल्ला केल्यानंतर सचिन काही वेळाने भानावर आला. आपल्या हातून घडलेल्या कृतामुळे तो भयभीत झाला होता. त्याने आपल्यासोबत दिवाळीसाठी फटाके आणले होते, त्यातील सुतळी बॉम्ब काढून स्वत:च्या चेहऱ्यावर फोडून जीव देण्याचा प्रयत्न केला मात्र अचानक घडलेल्या या घटनेमुळे सोसायटीमध्ये एकच खळबळ उडाली.

प्रेयसीवर चाकूचे वार केल्याने ती जागीच कोसळली तर प्रियकर देखील तोंडात सुतळी बॉम्ब फोडल्यामुळे चांगलाच भाजला आहे . घटनास्थळी दोघेही जागेवरच कोसळले. जखमी अवस्थेत दोघांना तातडीने कुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दोघेही गंभीर जखमी असून दोघांवर कुपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाबा साहेब साळुंखे करत आहे.