‘ त्यांनी आता संजना दानवे म्हणून नक्की फिरावं ‘, हर्षवर्धन जाधव कडाडले

शेअर करा

” माझ्या जोडीदार आता इशा आहेत ” असं वक्तव्य करत कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात स्पष्टपणे भाष्य केलेले आहे. आपल्या पहिल्या पत्नीला आता संजना हर्षवर्धन जाधव म्हणून फिरता येणार नाही, असं सांगत हर्षवर्धन जाधवांनी घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्णत्वास येत असल्याचे संकेत दिले आहेत. त्यातच मैत्रीण इशा झा यांच्यासोबत ‘अ ब्युटीफुल लाईफ !’ असं लिहिलेला फोटो शेअर करुन हर्षवर्धन जाधवांनी सर्वांना चकित केले आहे.

मी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. अशावेळी त्या आपण संजना हर्षवर्धन जाधव असल्याचं सांगत असतील तर हा निर्लज्जपणा आपण लक्षात घ्यावा. मध्यंतरी झालेल्या शेतकरी मेळाव्यात मला आणि इशाला माझ्या मातोश्रींनी आशीर्वाद दिले आहेत. अशा स्थितीत संजना या हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी म्हणून फिरत असतील तर ही लाजिरवाणी बाब आहे मात्र त्यांनी आता संजना दानवे म्हणून नक्की फिरावं, असं हर्षवर्धन जाधव यांनी नुकतंच म्हटलं.

हर्षवर्धन जाधव यांच्या मातोश्री आणि माजी आमदार तेजस्विनी जाधव यांच्या आशीर्वादाने ईशा झा यांनी एका मेळाव्यात भाषणाला सुरुवात केली होती. ईशा झा यांची ही एकप्रकारे राजकीय एन्ट्री मानली गेली. ईशा झा यांचे कौतुक करताना तेजस्विनी जाधवांनी त्यांना ईश्वराचा अवतार असे संबोधले होते. तसेच रायभान जाधव, आपल्याला, पुत्र हर्षवर्धन आणि नातू आदित्य यांना जसे कन्नडच्या जनतेने प्रेम दिले, तसेच प्रेम ईशालाही द्या, असे आवाहन त्यांनी केले होते.

इशा झा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या साथीने त्या राजकारणात सक्रिय झाल्या. त्यांना बालपणापासूनच समाज कल्याणाविषयी मनात तळमळ होती. मुंबईतील सर्वसामान्य कुटुंबात इशा झा यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मेकॅनिक होते. शिक्षण, आरोग्य अशा विषयात इशा झा यांनी काम केलं आहे. इशा झा यांना हर्षवर्धन जाधव यांच्या सहकारी आणि मैत्रीण म्हणून पाहिले जात होते. मात्र हर्षवर्धन जाधवांनी त्यांचा उल्लेख आपला जोडीदार असा करुन देत नातं स्पष्ट केले असल्याने त्यांच्या नात्याबद्दल होणाऱ्या चर्चांना एकाअर्थी पूर्णविराम मिळालेला आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी किरकोळ अपघाताच्या वादातून एका दुचाकीस्वाराला मारहाण केल्याचा पुण्यामध्ये आरोप झाला होता. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या इशा झा यांनीही संगनमताने शिवीगाळ करत हात आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असा आरोप तक्रारदार अमन अजय चड्डा यांनी केला होता.त्यावर इशा यांनी बोलताना, ” मी जेव्हा हर्षवर्धन जाधव यांना भेटले, तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं. ते उच्चशिक्षित आहेत. त्यांचं शिक्षण लंडनमधून झालं आहे. ते जेव्हा कलेक्टर, लोकप्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यांशी बोलतात, तेव्हा हर्षवर्धन यांच्या ज्ञानाने तेही गपगार होतात. आणेवारी, वीज कनेक्शन, आरोग्य, हायवे बांधकाम असा कुठलाही विषय असो, त्यांचा अभ्यास खूप आहे” अशा शब्दात इशा झा यांनी हर्षवर्धन यांचे कौतूक केले होते.

हर्षवर्धन जाधव सध्या त्यांच्या सहकारी ईशा झा यांच्यासह मतदारसंघात दौरे आणि मेळावे करत आहेत. दुसरीकडे संजना जाधवही राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. संजना जाधव या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांचा सत्कार समारंभात दिसून येत आहेत. अशावेळी हर्षवर्धन जाधव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात संजना जाधव या माझी पत्नी म्हणून कन्नड-सोयगाव मतदारसंघात फिरत आहेत. ज्या पतीला तुम्ही हा माणूस बरोबर नाही असं म्हणताय, त्याच्या नावाने फिरणं ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी या व्हिडीओत म्हटले आहे तसेच संजना यांनी आता संजना दानवे म्हणून फिरावं, असाही टोला हाणला आहे.

ऑगस्ट २०२० मध्ये माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कौटुंबिक त्रासाला कंटाळून घटस्फोटाचा निर्णय घेतला होता . कुटुंब न्यायालयात संजना जाधव यांच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती जाधवांनी दिली होती तेव्हाच भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा जावई म्हणून मला कुणीही संबोधू नये, अशी विनंतीही हर्षवर्धन जाधव यांनी केली होती.


शेअर करा