भाजपकडून घोडचूक, कमळ उगवण्याआधीच चक्क ट्विट डिलीट करण्याची आली वेळ

शेअर करा

चेन्नई- राहुल गांधी तसेच काँग्रेस पक्षाच्या ट्विटमधील चहाचे मळे आसाममधील नव्हे तर परदेशांतील असल्याचे शोधकार्य करणाऱ्या भाजपची सोशल मिडियाच्याच बाबतीत दांडी उडण्याचा आश्चर्यकारक प्रकार घडला आहे. तमिळनाडू शाखेने प्रतिस्पर्धी द्रमुकचे संस्थापक एम. करुणानिधी यांनी लिहिलेल्या गीताचा तसेच त्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांची सून आणि कार्ती यांची पत्नी श्रीनिधी यांच्या नृत्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

भाजपने तमिळनाडूतील विधानसभा निवडणूकीसाठी सत्ताधारी अण्णाद्रमुक पक्षाबरोबर युती केली आहे. दिवंगत मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या सेममोझी हे गीत व्हिडिओसाठी वापरण्यात आले होते. भरतनाट्यम नृत्यांगना असलेल्या श्रीनिधी या वैद्यकीय व्यावसायिक सुद्धा आहेत. त्यांनी सुमारे एका दशकापूर्वी जागतिक पारंपरिक तमीळ परिषदेच्या एका कार्यक्रमासाठी नृत्याविष्कार सादर केला होता. तेव्हाचा हा व्हिडिओ असल्याचे श्रीनिधी यांच्या सहकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

श्रीनिधी यांची छायाचित्रे किंवा व्हिडिओ त्यांच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाहीत, असे भाजपला बजावीत काँग्रेसने टोला लगावला. काँग्रेसने ट्विटमध्ये म्हटले आहे की, संमती ही तुम्हाला समजण्याच्या दृष्टिने अवघड संकल्पना असल्याचे आम्ही समजू शकतो. तुमची मोहीम म्हणजे खोट्या गोष्टी आणि अपप्रचाराने भारलेली आहे हेच तुम्ही सिद्ध केले आहे.

ही घोडचूक आम्ही व्हिडिओसाठी ज्याची सेवा घेतली त्या व्यावसायिकाच्या चुकीमुळे घडली असे तमिळनाडू भाजपकडून सांगण्यात आले. त्याने सरकारच्या एका संकेतस्थळावरून हा व्हिडिओ घेतला असे सांगत त्याच्यावर खापर फोडण्यात आले, मात्र यात कोणताही नियमभंग झाला नसल्याचे पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान शाखेचे सदस्य निर्मल यांनी सांगितले.

कमळ उगवेल अशा शीर्षकाचा संगीतमय व्हिडिओ भाजपने रविवारी पोस्ट केला होता. त्यात श्रीनिधी चिदंबरम यांचे दोन सेकंदांसाठी दर्शन घडते. श्रीनिधी यांच्या हे लक्षात येताच त्यांनी भाजपच्या संबंधित अकाउंटला टॅग केले. भाजप त्यांच्या अपप्रचारासाठी माझ्या छायाचित्राचा वापर करणे हास्यास्पद आहे, असे त्या म्हणाल्या. तमिळनाडूत कमळ कधीही उगवणार नाही, असेही त्यांनी तमीळ भाषेत लिहिले आहे. त्यानंतर भाजपने ट्विट तातडीने डिलीट केले


शेअर करा