‘ रडने का नही, भिडने का ‘ ज्योती देवरे ऑडिओ प्रकरणात मोठी घडामोड

शेअर करा

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आमदार निलेश लंके यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत सुसाईड ऑडिओ क्लिप जारी करणाऱ्या महिला तहसिलदार ज्योती देवरे यांची भेट घेतली आहे. चित्रा वाघ यांनी त्यावेळी पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांना ‘रडने का नही, भिडने का’ म्हणत पाठिंबा दिला तसेच आम्ही सर्व भाजपचे नेते तहसीलदार देवरे यांच्यासोबत असल्याचंही जाहीर केलं. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी परखड भूमिका घेत निलेश लंकेंविरोधात सातत्याने भुमीका घेतल्याचे पहायला मिळते आहे.

विशेष गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचा नुकताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा फोटो समोर आला होता. त्यावर देखील चित्रा वाघ यांनी सडकून टीका केली होती. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, “कमाल आहे. निलेश लंके यांनी आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटो काढून लगेच भाजपची दोन पावले माघारची बातमी छापून आणली..ओ लंके, ते आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत. दोन पावले माघार घेतं नाही, तर 200 पाऊलं पुढे जात ठोकणार आहे हे हे ध्यानात ठेवा. आम्ही सगळे ज्योतीताई देवरेच्या मागे सक्षमतेने उभे आहोत,”.

चित्रा वाघ आधीपासून आक्रमक

चित्रा वाघ यांनी याआधी देखील ‘सत्तेतले हे बेलगाम घोडे…देवमाणूस म्हणून मिरवणार्या पारनेरच्या या लोकप्रतिनीधीच्या नाकात वेसणं घालायचं काम महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणार्यांकडून होतयं का तेचं आता पहायचयं’, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता . ‘ हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात होत आहे. माँसाहेब जिजाऊंच्या महाराष्ट्रात होत आहे आणि आम्ही सावित्रीच्या लेकी, आमच्यासोबत हे सगळं होतंय. सत्तेच्या या बेलगाम घोड्यांना वेळीच वेसण घालणं गरजेचं आहे. देवमाणूस म्हणून वापरणाऱ्या पारनेरच्या या लोकप्रतिनिधीच्या नाकात महिला सशक्तीकरण आणि सक्षमीकरणाच्या बाता मारणारे कशी वेसण घालतात हेच आता पाहायचं आहे. नाहीतरी या महाराष्ट्रात बाई मेल्याशिवाय, तिने आत्महत्या केल्याशिवाय, तिने जीव दिल्याशिवाय तिच्या म्हणण्याला कुठे किंमत आहे ? ‘, असा संतप्त सवाल देखील चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन उपस्थित केला होता.

ज्योती देवरे यांच्या व्हायरल क्लिपमध्ये अधिकारी म्हणून होणारा त्रास, एकतर महिला त्यात जातीने मराठा म्हणून ऍट्रॉसिटीच्या कायद्याची विविध लोकांकडून दाखवण्यात येणारी भीती, वरिष्ठांकडून केले जाणारे दुर्लक्ष, नोकरीत येताना केलेला निर्धार आणि प्रत्यक्षात झालेली निराशा असे सविस्तर कथन त्यांनी या क्लीपमध्ये केले आहे. ज्योती देवरे यांनी प्रथमच आपली बाजू मांडली असून यात आपण काहीही चुकीचे केलेले नाही असे ठणकावून सांगितले आहे .

ज्योती देवरे म्हणाल्या, ‘ मी कोणताही घोटाळा भ्रष्टाचार केलेला नाही किंवा अनियमितता केलेली नाही, हे मी पुन्हा एकदा ठणकावून सांगते आहे. या पलीकडे आणखी काही स्पष्टीकरण देण्याच्या मनस्थितीत मी सध्या नाही. मला जे स्पष्टीकरण द्यायचे आहे ते मी वरिष्ठांकडे सादर करेल. यापूर्वी देखील मी माझ्या अडचणी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्या आहेत .ती क्लिप मी व्हायरल केलेली नाही. मी माझे शासकीय कामकाज करत आहे आणि प्राप्त परिस्थितीत मी नाउमेद होता पुन्हा जिद्दीने वाटचाल करणार आहे.’


शेअर करा