‘ त्या ‘ सावळ्या गोंधळानंतर सरकारवर टीकेची झोड , रोहित पवार यांचाही घरचा आहेर

शेअर करा

आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन मोठा सावळा गोंधळ काल पाहायला मिळाला. हजारो विद्यार्थी परीक्षा केंद्र असलेल्या शहरात जाऊन पोहोचल्यानंतर त्यांना परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा मेसेज मिळाला. त्यामुळे राज्यभरात महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे मात्र कालपासूनच या परीक्षेनंतर अनेक ठिकाणी नियुक्तीसाठी रॅकेट कार्यरत असल्याची देखील चर्चा होती, त्यामुळे परीक्षा त्यामुळेच रद्द करण्यात आल्याची देखील जोरदार चर्चा रंगू लागली आहे .

रोहित पवार काय म्हणाले ?

लवकरात लवकर म्हणजे काही दिवसांत परीक्षा पुन्हा घेण्यात यावी. ज्या काही त्रुटी आहेत त्या सोडवाव्यात. त्यासाठी एखादा वरीष्ठ अधिकारी नेमावा. आणि ज्यावेळी परीक्षा घेतली जाईल तेव्हा सर्वसामान्य मुलं एसटीचा प्रवास करतील तो तिकिटाचा खर्चही सरकारच्या माध्यमातून कसा देता येईल याबाबत विचार करावा. पण काहीही झालं तरी युवकांच्या भविष्याशी कुठल्याही सरकारनं खेळू नये .

आरोग्य विभागाच्या परीक्षा पुढे ढकलल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र या परीक्षेच्या नियोजनाचं काम ज्या न्यासा कम्युनिकेशन या कंपनीला आरोग्य विभागाने दिल होतं त्या कंपनीच्या अकार्यक्षमतेमुळे परीक्षा पुढे ढकलावी लागली, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. या कंपनीबाबत माहिती घेतली असता ही मूळ दिल्लीची कंपनी असून अशा प्रकारच्या परिक्षांचे आयोजन त्यासोबत परीक्षांचे नियोजन करण्याचं काम ही कंपनी करते.

आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झालेली नसून पुढे ढकलण्यात आलेली आहे. जाहीर केलेल्या जागा कोणत्याही परिस्थिती भरणारच आहे. कंपनीने असमर्थता दाखविल्यमुळे परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढावली. पण विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. मी विद्यार्थ्यांची माफी मागतो. पण विद्यार्थ्यांनी काळजी करु नये. येत्या काहीच दिवसांत परीक्षेच्या तारखेची घोषणा केली जाईल, असं स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं.


शेअर करा