नगर जिल्ह्यात पुन्हा शेततळ्याने घेतलाय महिलेचा बळी, माहेरच्यांकडून मात्र ?

शेअर करा

नगर जिल्ह्यासह राज्यात ठिकठिकाणी ग्रामीण भागात उन्हाळ्यात पाण्याची सोय व्हावी म्हणून सरकारी अनुदानातून शेततळी बांधण्यात आलेले आहे मात्र शेततळ्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या उपाय योजनांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असून त्यातून अनेक दुर्घटना देखील घडत आहे. नगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात पुन्हा एकदा अशीच एक घटना निळवंडे येथे उघडकीला आली असून शेततळ्यात एका महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आलेला आहे.

शितल सतीश केरे ( वय 32 ) असे मयत महिलेचे नाव असून रविवारी 22 तारखेला ही घटना उघडकीला आली आहे. निळवंडे शिवारात असलेल्या शेततळ्यात शितल यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. सदर घटनेची पोलिसांना खबर देण्यात आल्यावर काही मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीत शितल कपडे धुण्यासाठी शेततळ्यावर गेल्या होत्या त्यावेळी त्यांचा पाय घसरून मृत्यू झाला अशी फिर्याद दाखल केली आहे. संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे मात्र माहेरच्या व्यक्तींनी सदर प्रकरणी घातपात असल्याचा संशय व्यक्त केलेला आहे त्यामुळे रविवारी 22 तारखेला अंत्यसंस्काराच्या वेळी पोलिसांनी मोठा फौजफाटा अंत्यसंस्कार झालेल्या ठिकाणी दाखल केलेला होता.

शीतल यांचे माहेर राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक असून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास माहेरच्या मंडळींनी विरोध नोंदवला होता. सासरच्या लोकांनी तिचा घातपात केल्याचा संशय व्यक्त करून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी ‘ तुमची तक्रार घेतो पण अंत्यविधी रोखू नका ; असे सांगत समजुतीने मात्र सासरच्या दारातच अंत्यविधी पार पडला.


शेअर करा