दहा वर्ष देत होता पोलिसांना गुंगारा मात्र माहिती मिळताच पोलिसांनी रचला ‘ मास्टरप्लॅन ‘ : पुढे काय घडले ?

शेअर करा

१० वर्षांपूर्वी तो खुनाच्या गुन्ह्यात आरोपी होता मात्र फरार असल्याने पोलीस त्याच्या शोधात होते. तब्बल १० वर्षांनी त्याला अटक करण्यात आली आहे. बातमी अहमदनगर येथील असून आरोपीस पुण्यातून अटक करण्यात आली आहे . नगरपासून पुणे जवळ असून देखील आरोपी इतके दिवस कसा काय हाती लागला नाही हे देखील एक गूढ आहे. आरोपीचे नाव सर्फराज रज्जाक मणियार असे असून त्याला कोंढवा येथून गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली आहे .

उपलब्ध माहितीनुसार, सर्फराज रज्जाक मणियार (वय ३६ ,रा. कोंढवा खुर्द, मुळ. माळीवाडा अहमदनगर) असे अटक केलेल्याचे नाव असून नगर येथे ऑगस्ट २०१० मध्ये आरोपीने त्याच्या इतर साथीदाराच्या मदतीने पुर्व वैमनस्यातून नगरमधील दुसरा सराईत गुन्हेगार अमित वाघमारे याचे अपहरण करून खून केला होता. याप्रकरणी अहमदनगर येथील कोतवाली पोलिस ठाण्यात सर्फराज याच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.

पोलीस त्याच्या शोधात होतेच दरम्यान सर्फराजने कोंढव्यात वास्तव्य करून टुर्स अँड ट्रॅव्हलचा व्यवसाय सुरू केला . गुन्हे शाखेचे पोलिस अभिलेखावरील गुन्हेगाराची माहिती तपासत असताना कर्मचारी गजानन सोनुने यांना गुप्त सूत्रांच्या मार्फत नगर येथे दहा वर्षापूर्वी झालेल्या खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी सर्फराज हा कोंढव्यातील काैसरबाग परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक महेंद्र जगताप, उपनिरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचून सर्फराजला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे .


शेअर करा