पोलिसांवर हिरोगिरीचा आरोप अन ‘ रिवॉर्ड तर सोडा नोकरीच आली धोक्यात ‘ : काय आहे प्रकार ?

शेअर करा

तलवार आणि चाकूच्या धाकावर हैदोस घालून बियर बार लुटणाऱ्या आरोपींची नागपूर येथील जरीपटका पोलिसांनी अर्धनग्न अवस्थेत धिंड काढली होती. त्यांच्या या मोहिमेचे लोकांनी देखील चांगले स्वागत करत होते ‘ महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद ‘ अशा घोषणा देखील दिल्या होत्या मात्र यातील आरोपी हे अल्पवयीन असल्याने हे प्रकरण पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. ठाणेदार खुशाल तिजारे आणि एपीआय विजय धुमाळ यांच्यासह सात पोलिसांवर बाल न्याय अधिनियमांतर्गत एफआयआर दाखल झाल्याने शहर पोलिस दलात खळबळ निर्माण झाली आहे.

22 सप्टेंबरच्या रात्री जरीपटकातील एका बियर बार मध्ये शिरून सहा आरोपींनी तलवार आणी चाकूच्या धाकावर बियरबार मध्ये हैदोस घातला होता. बार व्यवस्थापक श्रेयस पाटील यांच्यासह दोघांवर रुबाब करत तलवार फिरवून बारमधील सात हजारांची रोकड आरोपींनी पळवून नेली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी काही कालावधीतच आरोपींचा शोध घेतला आणि त्यांना अटक केली. (Allegations of heroism against the nagpur police )

पोलिसांनी अटक केल्यानंतर गाडीचे चाक पंचर झाल्याचा झाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आणि पोलिसांनी त्यांना पायी पोलीस स्टेशनपर्यंत आणले. त्यानंतर अटक केलेल्या सहा आरोपींपैकी पाच आरोपी हे अल्पवयीन असल्याने काहीजणांनी हे प्रकरण उचलून धरले आणि अल्पवयीन आरोपीची अशा पद्धतीने धिंड काढल्याने पोलिसांवर हिरोगिरीचा देखील आरोप झाला.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सहाय्यक पोलीस आयुक्त परशुराम कार्यकर्ते यांना दिले आणि बालगुन्हेगार व त्यांचे नातेवाईक यांचे बयान नोंदवण्यात आले. शुक्रवारी तो चौकशी अहवाल सादर करताना बाल न्याय अधिनियमानुसार जरीपटकाचे ठाणेदार तिजारे सहाय्यक निरीक्षक धुमाळ यांच्यासह सात पोलिस दोषी असल्याचा ठपका अहवालात ठेवला आहे.

शहरात दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांच्या काही तासातच पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या त्यामुळे पोलिसांना मिळण्याची अपेक्षा होती मात्र रिवार्ड सोडा या घडामोडींमुळे त्यांची नोकरी धोक्यात आली आहे. नागपूर शहरात याआधी देखील गुन्हेगारांची धिंड काढण्याचे प्रकार घडले आहेत मात्र यावेळी बहुतांश गुन्हेगार हे अल्पवयीन असल्याने हे प्रकरण पोलिसांच्याच अंगलट आले आहे .


शेअर करा