नगर अर्बन बँक बचाव कृती समितीची एसपी ऑफिसवर धडक , निवेदनात म्हटलंय की..

शेअर करा

नगर अर्बन बँके मध्ये झालेला घोटाळा संपूर्ण राज्यात गाजत असून बोगस कर्ज प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांची मालमत्ता जप्त करण्यात यावी आणि ठेवीदारांच्या रकमा परत देण्यात याव्यात यासाठी नगर अर्बन बँक बचाव कृती समितीने आज अठरा ऑक्टोबर २०२३ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर इथे मोर्चा नेलेला होता. हतबल झालेल्या ठेवीदारांनी आपली व्यथा यावेळी प्रसारमाध्यमांसमोर मांडली . चार वर्षांपासून बँकेमधील घोटाळ्याबाबत आम्ही पोलिसांकडे तक्रारी देखील केलेल्या होत्या मात्र त्याची कुठलीही दखल घेण्यात आली नाही असे म्हणत ठेवीदारांनी संताप व्यक्त केलेला आहे . नगर अर्बन बँक बचाव कृती समितीमधील अनेक व्यक्तींनी यावेळी आपली भूमिका मांडलेली आहे .

नगर अर्बन बँक बचाव कृती समितीने एक प्रसिद्धीपत्रक दिलेले असून त्यामध्ये , ‘ 113 वर्षांची जुनी वैभवशाली बँक तिचा परवाना रिझर्व बँकेने 4 ऑक्टोबर 2023 रोजी रद्द केलेला असून त्यामुळे ठेवीदार आणि सभासद तसेच कर्मचारी यांचे भवितव्य अंधकारमय झालेले आहे. वास्तविक पाहता अर्बन बँकेतील चेअरमन , संचालक मंडळ , वरिष्ठ अधिकारी हे विविध घोटाळे आणि अपहार करत असल्याचे 17 फेब्रुवारी 2019 रोजीच म्हणजे सुमारे साडेचार वर्षांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांच्या निदर्शनास आणून दिलेले होते मात्र कार्यालयाने त्यावेळी कुठलीही दखल घेतली नाही ‘, असे म्हटलेले आहे.

प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की , ‘ हतबल झालेल्या बँकेच्या सभासदांना अखेर माननीय उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर इथे याचिका दाखल करावी लागली आणि खंडपीठाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर अहमदनगरचे कोतवाली पोलीस स्टेशनला आदेश देऊन गुन्हा नोंदविण्यात आला. त्या गुन्ह्यातील सर्व कलमे अजामीनपात्र होती मात्र पोलीस दलाकडून कोणत्याही संचालकाला ताब्यात घेण्यात आले नाही त्यामुळे संचालक पुन्हा भ्रष्ट कामे करत राहिले आणि त्याची परिणीती म्हणून अखेर 4 ऑक्टोबर 2023 रोजी बँकच बंद झाली.

बँक बंद झाल्यामुळे गोरगरीब ठेवीदारांचे सुमारे 320 कोटी रुपये अडकलेले असून सभासदांचे भाग भांडवल आणि लाभांशाचे देखील नुकसान झालेले आहे . वार्षिक सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा व्यवसाय बंद झाल्यामुळे सभासदांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून कोतवाली पोलीस स्टेशन इथे याआधी देखील चिल्लर घोटाळा , डमी जामीनदार घोटाळा , तोफखाना पोलीस स्टेशन येथे बनावट मूल्यांकन घोटाळा , शेवगाव पोलीस स्टेशन इथे बनावट सोनेतारण घोटाळा , राहता पोलीस स्टेशनला बँकेतर्फे तक्रार अर्ज , श्रीगोंदा पोलीस स्टेशनला बँकेतर्फे तक्रार अर्ज तसेच महाराष्ट्र ठेव कायद्याअंतर्गत अनेक अर्ज दाखल होऊन देखील दोषी व्यक्तींवर कुठलीही कारवाई केली गेली नाही म्हणून बँक बंद पडलेली आहे.

त्यामुळे संबंधित सर्व गुन्हे आणि तक्रार अर्जाचा विचार करून बँकेचे चेअरमन संचालक मंडळ यांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात याव्यात अन्यथा येत्या पंधरा दिवसात आंदोलन अधिक तीव्र करावे लागेल असे देखील म्हटलेले आहे. अनेक सभासद ठेवीदार यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपल्या व्यथा मांडलेल्या असून काही जणांना यावेळी अश्रू अनावर झालेले होते.


शेअर करा