धूम स्टाईलने मंगळसूत्र चोरणाऱ्या चोराची ‘ खरीखुरी ‘ स्टोरी ऐकून पोलिसही झाले निशब्द…..

शेअर करा

धूम स्टाईलने मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरास पोलिसांनी पकडले खरे मात्र त्याने सांगितलेली परिस्थिती ऐकून पोलीस देखील भावनावश झाले. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात ही घटना घडली आहे. मलकापूर येथील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलाच्या इलाजासाठी इकडे तिकडे हात पसरून पैशाची तजवीज न झाल्याने हतबल झालेल्या बापाने पैशासाठी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास करून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांनी त्याला पकडले आणि मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले. 20 ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला होता. Theft to pay the child’s hospital bill in buldhana malkapur

उपलब्ध माहितीनुसार, अनिल निनाजी लोणाग्रे ( वय 35 राहणार वरखेड तालुका मलकापुर ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शहरातील खयवाडी भागातील अर्चना दीपक गवळी ( वय २० ) ही महिला जेठाणीसह बांगड्या खरेदीसाठी दुकानावर जात होती. त्याच दरम्यान चावडीजवळ असलेल्या जय मेडिकलजवळ एकाने अर्चना यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून पलायन करण्याचा प्रयत्न केला. अर्चना यांनी आरडाओरड केल्याने रस्त्यावरील नागरिकांनी आरोपीचा पाठलाग करून त्याला जबरदस्त मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर चौकशी सुरू केली त्यावेळी त्याने चोरी करण्याचे कारण पोलिसांना सांगितले. सुरुवातीला पोलिसांनी या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही मात्र पोलिसांनी त्याच्या कारणाची चौकशी सुरू केली असता त्याचे म्हणणे खरे असल्याचे निष्पन्न झाले. उपचारासाठी केवळ तीन हजार रुपये बिलापोटी भरण्यास कमी पडत असल्याने त्याने ही चोरी केल्याचे कबूल केले.

आरोपी अनिल निनाजी लोणाग्रे याचा अकरा वर्षाचा मुलगा मलकापूर येथील चाळीस बिघा भागातील एका दवाखान्यात उपचारासाठी दाखल असून मंगळवारी त्यांची सुट्टी होणार होती मात्र दवाखान्याचे बिल आठ हजार रुपये झाले होते. जवळ पैसे नसल्याने त्याने दिवसभर पैशाची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पाच हजार रुपयांची व्यवस्था झाली मात्र तीन हजार रुपये कमी पडत होते. सगळीकडे हात पसरून थकल्यानंतर त्याच्याकडे कोणताच पर्याय राहिला नाही तेव्हा त्याने चोरी करण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्यात देखील त्याला अपयश आले आणि मार खाऊन पोलिसात जाण्याची वेळ आली.


शेअर करा