85 लाख पाहिजे तर आधी बारा लाख भरा ,  महिलेची केली फसवणूक

शेअर करा

देशभरात सध्या वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढलेले असून पुन्हा एकदा असाच एक प्रकार छत्रपती संभाजीनगर येथे समोर आलेला आहे . शेअर ऑनलाईन ट्रेडिंगच्या कामातून तुम्हाला पैसे मिळवून देतो असे सांगत या महिलेला तब्बल 26 लाख रुपयांना फसवण्यात आलेले आहे. 

फिर्यादी महिला या चिकलठाणा विमानतळासमोरील परिसरात राहत असून एका खाजगी कंपनीमध्ये काम करतात. त्यांच्या मोबाईलवर त्यांना अनुराग ठाकूर नावाच्या एका व्यक्तीने संपर्क करून आपण केकेआर ग्रुप ट्रेडिंग करून बोलत आहोत असे सांगत वर्क फ्रॉम होमचे आमिष दाखवत गुंतवणूक करण्यास सांगितलेले होते. 

9 फेब्रुवारी 2024 रोजी या महिलेने काही पैसे गुंतवले त्यामध्ये वाढ होत असल्याचे तिला दिसले आणि त्यानंतर अनुराग ठाकूर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी या महिलेसोबत सातत्याने संपर्क साधत आतापर्यंत तब्बल 26 लाख 60 हजार रुपयांना या महिलेला गंडा घातला. 26 लाखांचे 85 लाख रुपये झालेले आहेत असे सांगण्यात आले मात्र पैसे काढायचे असतील तर आधी बारा लाख 80 हजार रुपये भरावे लागतील असे त्यांना सांगण्यात आले. 

आतापर्यंत 26 लाख गुंतवल्यानंतर देखील पैसे मिळत नसल्याकारणाने या महिलेला संशय आला आणि त्यानंतर तिने अनुराग ठाकूर आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे. एम सिडको पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. विशेष बाब म्हणजे अशाच अनेक प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास देखील नागरिक टाळाटाळ करत असून सायबर गुन्हेगारीचा हा नवीन पॅटर्न पोलिसांसाठी देखील आव्हानात्मक ठरत आहे. 


शेअर करा