नगर शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण चिघळवण्याचे प्रयत्न ? 

शेअर करा

नगर शहरात धार्मिक उत्सवाच्या नावाखाली मिरवणुका काढून त्यामध्ये द्वेषपूर्ण भाषण करून किंवा द्वेषपूर्ण घोषणा करून शहरातील वातावरण बिघडवण्याचे प्रकार होण्याची दाट शक्यता आहे. हिंदू मुस्लिम सलोख्याची परंपरा असलेल्या नगर शहरात अशा व्यक्तींमुळे कुठल्याही क्षणी शहरात दंगलीचा भडका उडण्याची शक्यता आहे.  आतापर्यंत सुदैवाने नगरकरांनी अशा कुठल्याही प्रकाराला दाद दिलेली नाही आणि दंगलीचे प्रयत्न हाणून पाडलेले आहेत मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिक काळजी घेणे गरजेचे झालेले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांचे ध्रुवीकरण करण्याच्या उद्देशाने कुठल्याही क्षणी शहरातील वातावरण चिघळण्याची शक्यता आहे. धार्मिक मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग असतो तसेच माध्यमांची देखील नजर अशा मिरवणुकांवर असते. पोलिसांनी वास्तविक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा धार्मिक मिरवणुकांना परवानगी देणेबद्दलच काळजी घेणे गरजेचे आहे मात्र अनेकदा राजकीय दबावातून अशा परवानग्या दिल्या जातात आणि जनतेला वेठीस धरून शहरातील वातावरण केवळ मतांसाठी बिघडवले जाते . 

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना महायुती तसेच महाविकास आघाडी कडून सध्या जोरदार प्रचार सुरू आहे.  महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात तीव्र लढत असून दोन्ही बाजूचे कार्यकर्ते तसेच त्या त्या पक्षाचे नेते आपापल्या उमेदवारासाठी प्रचारात कार्यरत आहेत. पोलीस दलाने या पार्श्वभूमीवर अधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे. 


शेअर करा