तुझ्या बापाची मालकी आहे की राज्य आहे इथं :? अमृता फडणवीस यांच्या गाण्याने पेटला वाद

  • by

अमृता फडणवीस यांच्या ‘ तिला जगू द्या ‘ गाण्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतानाच आता दुसऱ्या वादाला तोंड फुटलं आहे. अमृता फडणवीस यांच्या गाण्यावरुन दिग्दर्शक महेश टिळेकर आणि अभिनेता आरोह वेलणकर यांच्यात वाद रंगायला लागला आहे. अमृता फडणवीस यांच्या ‘तिला जगू द्या’ या गाण्यावर महेश टिळेकर यांनी फेसबुक पोस्ट करत जोरदार टीका केली होती. अभिनेता आरोह वेलणकर याला ही टीका चांगलीच झोंबली असून त्याने टिळेकरांवर टीकेची तोफ डागली आहे.

नक्की काय घडला होता प्रकार?

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवे गाणे भाऊबीजेच्या मुहूर्ताला टी सीरिजने रिलीज केल्यामुळे काही तासांतच ते व्हायरल झाले. अमृतांनी हे गाणे नारी शक्तीला समर्पित केले आहे. हे गाणे शेअर करताना त्यांनी स्वत:चा आणि मुलीचा फोटो वापरला आहे. अमृतांच्या या गाण्याला दोनच दिवसांत 10 लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत मात्र लाईक्सच्या तुलनेत डिसलाईकचे प्रमाण १० पट आहे तर कमेंट्स देखील त्यांना ‘ गाऊ नका ‘ असा सल्ला देणाऱ्या असल्याने अमृता यांनी ट्विट करुन चाहत्यांचे आणि टीकाकारांचेही आभार मानले.

नारीशक्तीच्या सन्मानार्थ या गाण्याचे बोल आहेत मात्र गाण्याची भट्टी जमली नाही असेच बहुतांश नेटिझन्सचे मत आहे . इंटरनेटवर हे गाणं व्हायरल झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी सर्वांचे आभार मानले. ”तिला जगू द्या… या गाण्याचं आपण कौतुक केलंत, त्यामुळेच गेल्या 2 दिवसांत तब्बल 10 लाख व्ह्यूवज तिला मिळाले असून आपण गाण्याला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपणा सर्वांचे आभार, असे अमृता फडणवीस यांनी म्हटलंय. तसेच, माझं कौतुक करणाऱ्या आणि माझ्यावर टीका करणाऱ्या सर्वांचं मी आभार मानते. लवकरच, मी नवीन काहीतरी घेऊन आपल्या भेटीला येईल,” असेही अमृता यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

निर्माता व दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी, ” हिला नको गाऊ द्या.. चांगला आवाज असूनही केवळ नाव नाही हाती भरपूर पैसा नाही म्हणून नवीन गायकांना कुणी मदतीचा हात देऊन संधी देणारा पाठीशी उभा राहत नाही. सुमधुर आवाज असलेल्या महाराष्ट्रातील अनेक नवीन गायकांना साधी कुठं संधी मिळत नाही पण जिचा आवाज ऐकला की कानाचे पडदे फाटण्याची भीती निर्माण होते ,लाखो तरुणांच्या ह्रदयात धडकी भरते आणि गाणं हे दुसऱ्याला आनंद देण्याऐवजी दुःख देण्यासाठीच गायले जाते असा समजच होण्याची शक्यता निर्माण होते अशी एक आपल्याच विश्वात धुंद होऊन गाणारी विश्र्वगायिका लोकांना सातत्याने का छळत आहे? ” अशी फेसबुक पोस्ट लिहून अमृता फडणवीस यांच्यावर चांगलीच टीका केली होती.

अमृता फडणवीस यांच्यावरील टीकेनंतर अभिनेता आरोह वेलणकर याने “महेश टिळेकर तुमची टीका ऐकून लाज वाटली. मराठी तारका नावाचा कार्यक्रम करता, स्त्री शक्ती, सन्मानाच्या गोष्टी करता आणि ही कसली भाषा तुमची? नसेल आवडत तर नका ऐकू, टीका करायची तर तमा बाळगून करा, कोण समजता तुम्ही स्वत:ला?. या आधी व्हाया व्हाया माझ्यावरही आणि इतर नटांवरही टीका केलीत. तेव्हा दुर्लक्ष केलं. तुम्ही तुमच्या पोस्ट काय विचार करुन, ओढून, पिऊन, समजून करता ते कळणं कठीण आहे. फुटेजसाठी करत असाल तर अधिकच हीन आहे तुमचं सगळं ! सुधारा .. राहिला प्रश्न मराठी तारकांचा तर ह्या तुमच्या स्टंटमुळे कोण काम करतंय ते बघू” अशा तिखट शब्दात आरोह वेलणकरने टिळेकरांवर टीका केली.

महेश टिळेकरांनी आरोह वेलणकर याला काय प्रत्युत्तर दिलं?

बेसूर ,गाणारी स्वयंघोषित गायिका, जिच्यावर मी पोस्ट लिहिल्यामुळे तुझा थयथयाट होऊन तू मला धमकी वजा संदेश देतोय,तुझ्या बापाची मालकी आहे की राज्य आहे इथ, कोण माझ्याकडे कार्यक्रम करणार म्हणून तू धमकी देऊन मला सांगतोय.कलाकार तुझ्या दावणीला बांधले आहेत की त्यांचं पालकत्व घेतलं आहेस म्हणून तुझ्या सांगण्यावरून कलाकार ऐकणार.. आधी स्वतः चे करिअर बघ. आणि फुटेज पब्लिसिटी मिळवण्यासाठी तूच बिग बॉस मध्ये गेला होतास ना? का तिथे समाजसेवा करायला गेला होतास? ज्या कलाकारांच्या वर टीका केली तेंव्हा का तू बिळात जाऊन बसला होतास? ते तुझे समविचारी दिसतायेत म्हणून तुला मिरच्या झोंबल्या का?

जेव्हा मराठी कलाकारांची लायकी ट्रेन नी फिरण्याची आणि गाय छाप तंबाखू खाण्याची आहे असं विधान तू ज्यांचा भक्त आहेस त्या राजकीय पक्षाच्या व्यक्तीने केले होते तेंव्हा तुझे रक्त उसळले नाही का? तेंव्हा कलाकारांची बाजू घेऊन बोलायला पुढं का आला नाहीस रे? कुठं पिऊन पडला होतास की शेपूट घालून बसला होतास? तुझं वय जितकं आहे ना तितकी माझी कारकीर्द आहे. आता तुझा जळफळाट होतोय तेंव्हा कुठं गेला होतास रे तु,जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराज, मराठी भाषा , महापुरुषांचा, महाराष्ट्राचा, मुंबई पोलिसांचा अपमान इतर कलाकार करत होते तेंव्हा तू आईच्या पदराआड लपला होतास की मूग गिळून गप्प बसला होतास?

स्त्री सन्मान आणि कला सन्मान यातला आधी फरक ओळखायला शिक. जे बेसूर आहे त्याला अमृतवाणी समजून डोक्यावर घेनाऱ्यातला मी नाही.आणि आठवत नसेल तर नीट आठव पुण्यात हनुमंत गायकवाड यांच्या ऑफिसमध्ये भेटून तू माझ्याकडे काम मागत होतास,ते विसरलास का? जिथं बोलायचं तिथं बोलतो मी ,आणि तुझ्यात खरीच हिम्मत असेल तर समोर येऊन धमकी दे म्हणजे माझी पोस्ट वाचून जी आग आणि धूर बाहेर येत आहे तो तुझ्या शरीरातील नेमका कोणत्या अवयवा मधून बाहेर येत आहे ते पाहून तुझं बिन टाक्याचे ऑपरेशन करायचे की टाके घालून ते मला ठरवता येईल