दोन महिन्यांपासून मुलांसह विवाहित महिला होती गायब.. सापडताच घडले ‘ असे काही ‘ की ?

शेअर करा

गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या भिवंडी तालुक्यातील पाच्छापूर उंबरखांड गावातील एक महिला आणि तिच्या तीन मुलांचे मृतदेह येथील डोंगर परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. चारही मृतदेह सडलेले असून या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळताच महिलेचा पती आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीने देखील विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान या चौघांच्याही मृत्यूची चौकशी ठाणे ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत आहे.

उपलब्ध माहितीनुसार, उंबरखांड गावात राहणारी रंजना श्रीपत बांगारे (३०) आणि तिची तीन मुले दर्शना (१२), रोहित (९ वर्ष), रोहिणी (६ वर्ष) असे चौघेही २० ऑक्टोबरपासून बेपत्ता होते. शेतावर चवळी तोडण्यासाठी जातो म्हणून हे सर्वजण घरातून निघून गेले. मात्र परत घरी परतले नाहीत. स्थानिक गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला. मात्र सापडले नाहीत.त्यानंतर सदर प्रकाराची पोलिसात नोंद करण्यात आली.

गुरुवारी दुपारी या महिलेचा दीर आणि त्याची पत्नी लाकडे गोळा करण्यासाठी उंबरखांडच्या जंगलात गेले होते. त्यावेळी जंगलात कसला तरी उग्र वास येत होता. त्यांनी आसपास पाहिले असता येथील गण्याच्या डोंगरावरील आपट्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दोन मृतदेह तर अन्य दोन मृतदेह खाली पडलेले दिसून आले. हे मृतदेह सडून केवळ सांगाडे राहिले होते.

मागील दोन महिन्यापासून बेपत्ता असलेल्या रंजना आणि तिच्या तीन मुलांचे हे मृतदेह होते. याबाबतची माहिती कळताच रंजनाचा पती आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीने विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना तात्काळ उपचारासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडलेल्या चारही मृतदेहांबाबत तपास सुरू असून मृत महिलेचा पती आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीची प्रकृती आता स्थिर आहे. रंजना हिच्या पतीने दुसरे लग्न केले आहे. यावरून त्यांच्यात कुरबुर चालू होती, असे ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी सांगितले.

या आत्महत्या प्रकरणात कौटुंबिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये समोर आले आहे. त्यामुळे महिलेचा पती श्रीपत आणि सवत सविता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली असून प्रकरणाची अधिक चौकशी सुरु आहे.


शेअर करा