बंगल्याचे दार लोटलेले ..बहीण भावाची अमानुष हत्या करून चोरटयांनी दीड किलो सोने पळवले : महाराष्ट्रातील बातमी

शेअर करा

एकीकडे कोरोनाने थैमान घातले असताना गुन्हेगारीत मात्र मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहेत . औरंगाबाद इथे घडलेल्या ताज्या घटनेत बहीण आणि भाऊ दोघेच घरी असल्याचा फायदा घेत चोरांनी त्यांची अमानुष हत्या करून घरातील दीड किलो सोन्याचे दागिने आणि रोख साडेसहा हजार रुपये लुटून नेल्याची घटना औरंगाबाद येथील सातारा परिसरातील कनकोरबेन नगरात मंगळवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. किरण लालचंद खंदाडे – राजपूत (वय १८ वर्ष ) आणि सौरभ लालचंद खंदाडे – राजपूत (वय १६ वर्ष) अशी हत्या झालेल्या बहिणभावाची नावे आहेत . या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह घाटी रुग्णालयात हलविले आहेत .

कनकोरबेननगरमध्ये २०१७ पासून बंगला भाड्याने घेऊन लालचंद खंदाडे हे पत्नी, मुली सपना (२१), किरण (१८) आणि मुलगा सौरभ याच्यासह राहत आहेत. खंदाडे परिवाराची जालना जिल्ह्यातील पाचनवडगाव येथे शेती आहे तर लालचंद यांनी बोलावल्यामुळे आज मंगळवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमाराला पत्नी आणि मोठी मुलगी सपना हे कारने पाचनवडगावला गेले होते. तर दुसरी मुलगी किरण आणि मुलगा सौरभ हे घरीच थांबले होते. मंगळवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास लालचंद यांची पत्नी, मुलगी सपना आणि सासू औरंगाबादला परतल्या तेव्हा त्यांनी गेटमधून मुलाना आवाज दिला. मात्र आतून प्रतिसाद आला नाही . बंगल्याचे दारही लोटलेले होते. सर्वजण आत गेले तेंव्हा त्यांना बाथरुममध्ये किरण आणि सौरभ रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेले दिसले. दोघांचे गळे धारदार शस्राने कापलेले तसेच डोक्यावर जखमा होत्या. शिवाय घरातील दीड किलो सोन्याचे दागिने असलेली बॅग आणि रोख साडे सहा हजार रुपये चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले .

त्याची तात्काळ ह्या घटनेची माहिती पोलिसांना कळवली असता, पोलिस उपायुक्त डॉ . राहुल खाडे , पोलीस उपायुक्त मीना मकवाना , सहायक आयुक्त हनुमंत भापकर , सातारा ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाले , गुन्हेशाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड आणि अन्य अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली,याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती .

मयत मुलगी किरण आणि मुलगा सौरभ यांना कॅरम खेळाची आवड होती. दोघे बहीण भाऊ कॅरम खेळताना मारेकरी त्यांच्या बंगल्यात घुसले असावे, कारण कॅरमचा खेळ अर्धवट राहिल्याचे कॅरम बोर्ड वरुन दिसत होते . सौरभ दहावीत तर किरण होती पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत होते. सौरभ येथील पोद्दार शाळेत दहावीत शिकत होता . त्याने दहावीची परीक्षा दिली होती तर किरण ही पुण्यातील मॉर्डन कॉलेजमध्ये बी ए प्रथम वर्षात शिकत होती . ह्या हत्याकांडाने औरंगाबाद शहर हादरून गेले आहे .


शेअर करा