‘ त्या ‘ पेट्रोल पंपाचा पेट्रोल पुरवठा बंद करण्याची तयारी, मोदींची हुबेहूब मिमिक्री पहाच

शेअर करा

राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल दराने शंभरी पार केलीय. तोच धागा पकडत प्रसिद्ध कॉमेडियन श्याम रंगीलाने यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिमिक्री करत एक व्हिडीओ बनवला. मात्र, याच व्हिडीओवरुन श्याम रंगीलाची अडचण वाढण्याची शक्यता आहे. ज्या पेट्रोल पंपावर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला त्या पेट्रोल मालकाने रंगीलाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पेट्रोल मालकावर देखील दबाव असल्याची चर्चा असून यावर श्याम रंगीला याने आणखीन एक व्हिडीओ शेअर करून परिस्थिती सांगितली आहे.

कॉमेडियन श्याम रंगीलाने श्रीगंगानगरमधील हनुमानगड रोडवर एका पेट्रोल पंपावर हा व्हिडीओ शूट केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर आता पेट्रोल पंप मालक सुरेंद्र अग्रवाल यांनी कॉमेडियन रंगीलाविरोधात तक्रार दाखल करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. पंप मालक अग्रवाल इंधन पुरवणाऱ्या कंपनीच्या दबावात ही मागणी करत असल्याचंही बोललं जातंय. असं न केल्यास त्यांच्या पेट्रोल पंपाचा इंधन पुरवठा बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय.

आपल्या कॉमेडी व्हिडीओमध्ये श्याम रंगीलाने पेट्रोल-डिझेलच्या गगनाला शिवणाऱ्या किमतीवर मोदींच्या खास भाषण शैलीत उपरोधात्मक भाष्य केले होते . यात श्याम रंगीला म्हणाला, “माझ्या प्रिय देशवासीयांनो राजस्थानमधील श्रीगंगानगरच्या जनतेची छाती अभिमानाने फुगली आहे. या ठिकाणी पेट्रोलची किंमत 100 रुपयांवर गेलीय. भावांनो आणि बहिणींनो स्वतंत्र भारताच्या इतिहासात आजपर्यंत असंही एकही सरकार आलं नाही ज्याने पेट्रोलला त्याची खरी किंमत दिली असेल. पेट्रोलला त्याचा हक्क आम्ही मिळवून दिला.” कॉमेडियन श्याम रंगीलाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर भाजप समर्थकांचा थयथयाट सुरु झाला आणि वेगवेगळ्या मार्गाने त्या पेट्रोल पंपाच्या मालकास आणि कॉमेडियन श्याम रंगीला यास घेरण्याचा उपद्याप भाजपने सुरु केला .

पेट्रोल पंप मालक सुरेंद्र अग्रवाल यांनी रंगीलावर फोटो घेण्यासाठी परवानगी घेत व्हिडीओ तयार केल्याचा आरोप केलाय. ते म्हणाले, “कॉमेडियन श्याम रंगीलाने तो पत्रकार असल्याचं सांगत मला फोन केला होता. त्याने माझ्याकडून फोटो काढण्याची परवानगी घेतली होती. मात्र, 17 फेब्रुवारी सायंकाळी साडेपाच ते सहा दरम्यान काही लोक बाईकवर आले आणि त्यांनी व्हिडीओ तयार केला.संबंधित लोक व्हिडीओ काढण्यासाठी पंपावर आले तेव्हा पंपावर गर्दी होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्या व्हिडीओ शुटिंगकडे लक्ष दिलं नाही. या प्रकरणात कंपनीची माफी मागण्यात आलीय. तसेच पंपावरील दोन कर्मचाऱ्यांनाही सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय,” असंही पेट्रोल पंप मालकाने म्हटलंय.

त्यानंतर श्याम रंगीला याने आणखीन एक व्हिडीओ शेअर केला असून आपण त्या पेट्रोल पंपवाल्याला झालेल्या मनस्तापाबद्दल माफी मागण्यास तयार असल्याचे म्हटले आहे मात्र जो व्हिडीओ बनवला तो काढून टाकणार नाही आणि आपण काही चुकीचे केलेले नाही असे भाजपच्या भक्तांना ठणकावून सांगितलं आहे . १०० रुपये पेट्रोल झाल्यावर त्याविरोधात बोलण्याचे देखील स्वातंत्र्य लोकांना असावं असे भाजपाला वाटत नाही, हेच यावरून स्पष्ट झाले असून विरोधक आणि लोकांचा आवाज दाबण्यासाठी भाजप कितीही खालच्या पातळीवर जाऊ शकते हे स्पष्ट झाले आहे .


शेअर करा