ब्रेकिंग..गजा मारणेच्या विरोधात हिंजवडी पोलिसांची ‘ मोठ्ठी ‘ कारवाई

  • by

पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेच्या नऊ साथीदारांना हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत . तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांनी पुणे-बंगळुरु महामार्गावर धिंगाणा घातला होता. त्यानंतर पोलिसांनी मारणेच्या साथीदारांना जेरबंद केलं आहे

गजा मारणेच्या साथीदारांनी 15 फेब्रुवारीला पुणे-बंगळुरु महामार्गावर विनापरवाना रॅली काढणे, आरडाओरडा करणे, सर्वसामान्यांची वाहनं रोखून दहशत माजवण्यासारखे प्रकार केले होते. पोलिसांची या प्रकरणी चांगलीच नाचक्की झाली होती त्यामुळे गजासह 150 साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यातूनच ही कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी शिरगाव चौकी आणि तळेगाव पोलीस ठाण्यात गजा मारणेविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर टोल न भरणे, फूड मॉलवर जबरदस्तीने वस्तू उचलणे, याचा ठपका गजा मारणेवर ठेवण्यात आला आहे. तसेच गजा मारणे याच्यावर मोक्का कायद्या अंतर्गत कारावाई केली जाईल, असेही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी याआधीच स्पष्ट केले होते.

पप्पू गावडे आणि अमोल बधे खून खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणेच्या साथीदारांनी त्याची तळोजा कारागृहाबाहेरुन मिरवणूक काढली होती. गजा मारणे हा त्याच्या साथीदारांसह द्रुतगती महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने येत होता. या मिरवणुकीत जवळपास 300 गाड्या होत्या.

त्यावेळी त्याच्या साथीदारांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला होता. या सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. तसेच उर्से टोल नाक्यावर गजा भरणे यांने टोल न भरणे तसेच आधीच्या दुकानातून जबरदस्तीने सामान घेतल्याचे काम त्याच्या साथीदाराने केले होते. तसा आरोप गाजा मारणे आणि त्याच्या साथीदारांवर ठेवण्यात आला आहे.

गजा मारणे तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर त्याची मिरवणूक काढण्यात आली होती. गजा बसलेल्या गाडीची किंमत तब्बल दोन कोटी रुपये होती. मिरवणुकीत असलेली लँडक्रझर गाडी पुण्यातील काही मोजक्याच लोकांकडे आहे. गजा मारणेची या गाडीतून मिरवणूक निघाल्यामुळे त्याची चांगलीच चर्चा झाली होती. गजा मारणे यांने केलेल्या शक्तीप्रदर्शनाचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर राज्याच्या पोलीस व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.