डुप्लिकेट रेमडेसिव्‍हिर तर घेत नाही ना ? महाराष्ट्रातील ‘ ह्या ‘ शहरात घडलाय प्रकार

शेअर करा

संपूर्ण राज्यात कोरोना रुग्‍णांच्‍या उपचारासाठी रेमडेसिव्‍हिर इंजेक्‍शनचा तुटवडा भासू लागला आहे. रुग्‍णाचे नातेवाईक चारही दिशांना फिरुन इंजेक्‍शन मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्‍न करत आहेत. मात्र या परीस्‍थितीत गैरफायदा घेतला जात असून त्यांच्या माथी चक्क बनावट रेमडेसिव्‍हिर मारण्यात आल्याची घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे . दैनिक सकाळने याबद्दल वृत्त दिले असून सकाळच्या प्रतिनिधींकडून अन्न व औषध प्रशासनाच्‍या सहआयुक्‍त माधुरी पवार यांना फोन व मॅसेजद्वारे संपर्क केला असता त्‍यांनी प्रतिसाद दिला नाही.

रुग्‍णाच्‍या नातेवाईकांनी केलेल्‍या आरोपानुसार, त्‍यांनी देसाई नामक व्‍यक्‍तीकडून इंजेक्‍शन खरेदी केले. साडे तीन हजार रुपये प्रति इंजेक्‍शन या दराने खरेदी केलेले सर्व इंजेक्‍शन्‍स नकली होते. त्‍यावर फेविक्‍विकने चिटकवलेले होते. दरम्‍यान संबंधिताला विचारणा केल्‍यानंतर त्या व्यक्तीने पैसे परत दिले असल्याचा खुलासा संबंधित रुग्‍णाच्‍या नातेवाईकांनी केला आहे. परंतु त्‍या बदल्यात संबंधिताकडून सर्व इंजेक्‍शन परत देण्याची मागणी झाल्‍याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले.

परीस्‍थितीचा गैरफायदा घेत अशा पद्धतीने फसवणूक होणे गंभीर आहे. त्‍यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणे आवश्‍यक झाले आहे. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाच्‍या सहआयुक्‍त माधुरी पवार यांच्‍याशी संपर्क साधण्याचा प्रयत्‍न केला असता त्‍यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. या घटनेबाबत जिल्‍हा प्रशासन व अन्न व औषध प्रशासन विभाग काय भुमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल. रुग्‍णाच्‍या नातेवाईकांच्‍या दाव्‍याची सत्‍यता व या संपूर्ण प्रकाराविषयीची माहिती चौकशी होणे अत्यंत गरजेचे असून अशाच पद्दतीने नागरिकांना गंडा घालणाऱ्या प्रवृत्तीवर अंकुश ठेवणे अत्यंत गरजेचे झाले आहे .


शेअर करा