‘ तुमच्या देवाचे हात रक्ताने माखले आहेत ‘, अमेरिकेतील अंधभक्तांना लेखिकेचे खुले पत्र

  • by

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. भारताला अनेक देशांमधून मदत केली जात आहे. मात्र, यावरून आता पंतप्रधान मोदींवर टीका केली जात आहे. दिल्लीतील एक लेखिका विनिता मोक्किल यांनी अमेरिकेतील पंतप्रधान मोदींच्या अंधभक्तांना खुले पत्र लिहिले असून मदत न करण्याचा सल्ला दिला आहे.

विनिता मोक्किल यांनी ‘अमेरिकेतील मोदी भक्तांना खुले पत्र: तुमच्या देवाचे पाय मातीचे आणि हात रक्ताने माखलेले’ या शीर्षकाने लेख लिहिला आहे. दक्षिण आशियाई अमेरिकन संकेतस्थळ ‘अमेरिकन कहानी’ यावर हा लेख प्रकाशित झाला आहे. हा कालावधी भक्तांना आत्मनिरीक्षण करण्यासाठी एकदम योग्य आहे. विशेष करून राम मंदिरासाठी मतदान करणारे आणि कोरोना संकटाचा सामना करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. एकीकडे ऑक्सिजनच्या अभावामुळे रुग्ण तडफडून मृत्यू पावत असून, दुसरीकडे तुमचा देव २२ कोटींचा महाल साकारण्यात गुंतला आहे, अशी बोचरी टीका या पत्रातून करण्यात आली आहे.

विनिता यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, गर्वाने परिपूर्ण योजना राबवत असताना, दुसरीकडे मात्र कोरोनाच्या लसी आयात करण्याचे निर्देश द्यायला विसरले. परंतु, हीच गोष्ट होती, जी भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून वाचवू शकत होती, असा घणाघात विनिता यांनी केला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी निवडणुका जिंकण्यासाठी जय श्रीरामचा वापर केला, जप केला. मुस्लिम समुदायाला हिंदूविरोधात उभे करण्याचे काम त्यांनी केले. समाजातील तणाव वाढण्यासही ते कारणीभूत असल्याचा दावा या लेखिका विनिता यांनी केला आहे. तुमचा देव हिंदूंचा रक्षक असल्याचा दावा करतो. मात्र, त्यांनी कुंभमेळ्याला परवानगी का दिली, अशी विचारणाही या खुल्या पत्रात करण्यात आली आहे.

दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात एका दिवसात ४ लाख ३ हजार ७३८ नागरिक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. काहीसा दिलासादायक बाब म्हणजे याच कालावधीत देशभरात ३ लाख ८६ हजार ४४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. तर देशात सलग चौथ्या दिवशी चार हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे.