भाजप खासदाराला ब्रश न मिळाल्यानं चक्क हातानंच स्वच्छ केलं कोविड सेंटरमधील टॉयलेट

शेअर करा

मागील काही दिवसांपासून देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. अशात भाजपचे अनेक राजकीय नेते अजब गजब वक्तव्य करताना दिसत आहेत. अशात मध्य प्रदेशातील भाजपचे खासदार जनार्दन मिश्रा यांनी भलतीच सेवा केली आहे. कोविड सेंटरला दिलेल्या भेटीदरम्यान तेथील शौचालय अस्वच्छ दिसल्यानं संबंधित भाजप खासदारानं स्वतः च्या हातानं हे शौचालय स्वच्छ केलं आहे. त्यांच्या या कारनाम्यामुळे त्यांची सोशल मीडियात जोरात चर्चा सुरू आहे. चक्क स्वतःच्या हाताने टॉयलेट साफ केल्याने ते चांगलेच चर्चेत आले आहेत.

मध्य प्रदेशातील रीवा लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले भाजप खासदार जनार्दन मिश्रा सोमवारी मऊगंज जनपद तालुक्यात दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी तालुक्यातील विविध कोविड केंद्रांना भेटी दिल्या आणि परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान त्यांनी कुंज बिहारी येथील कोविड सेंटरलाही भेट दिली. यावेळी येथील शौचालय अस्वच्छ असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं. पण त्यानंतर त्यांनी गांधीगीरी करत स्वतः शौचालय स्वच्छ करायला घेतलं.

यावेळी त्यांना शौचालय स्वच्छ करण्याचा ब्रश न मिळाल्यानं त्यांनी हातात हातमोजे घालून शौचालय साफ केलं आहे. यावेळी त्यांचे अनेक कार्यकर्ते त्याठिकाणी उपस्थित होते. यातील एका कार्यकर्त्यानं या घटनाक्रमाचा व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड केला आहे. त्यानंतर त्यांच्या अशाही कामाचं कौतुक सोशल मीडियावर देखील व्हायला सुरू झाली मात्र व्हिडीओ बनवणारे इतके सारे कार्यकर्ते असताना त्यातील कोणी या महाशयांना ब्रश का आणून दिला नाही ? हा देखील एक प्रश्न आहे.


शेअर करा