पुण्यात लसीकरणाच्या नावाने भाजप नगरसेवकांचा ‘ हा ‘ उद्योग , राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

शेअर करा

पुणे शहरात भाजप नगरसेवक लसीकरणाच्या नावाखाली नागरिकांचा डेटा चोरत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. पुणे शहर तथा देशभरात लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. लसीकरणासाठी प्रत्येक नागरिकाचे केंद्र सरकारच्या कोविन अॅपमध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन केले जात आहे

लसीकरणासाठी गोळा करण्यात आलेली नागरिकांची माहिती पुणे महानगरपालिका प्रशासन आणि केंद्र सरकारच्या प्रशासनाकडे सुरक्षितरित्या जतन असणे हे अपेक्षित आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या गोपनीय कायद्यानुसार हा डेटा कुठल्याही राजकीय पक्षाला व्यवसायिक आणि आस्थापनांना देता येत नाही. पण संबंधित डेटा भाजपच्या काही नगरसेवकांना देण्यात आल्याचा आरोप प्रशांत जगताप यांनी केला आहे.

“पुणे शहर तथा देशभरात व्हॅक्सिनेशन खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. या लसीकरणाच्या माध्यमातून लस घेतलेल्या नागरिकांचा डेटा फक्त केंद्र सरकार आणि पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाकडे गोपनीय कायद्याअंतर्गत असणे गरजेचे आहे. असे असताना राजकीय फायद्याकरता सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना हा डेटा उपलब्ध करून दिला आहे. हा सर्वसामान्य पुणेकरांचा विश्वासघात आहे”, असं प्रशांत जगताप म्हणाले.

“प्रत्येक नागरिकाच्या आधारकार्डवर त्यांची वैयक्तिक, खाजगी, आर्थिक माहिती, मालमत्ते विषयी माहिती आहे. या सर्व माहितीचा डेटा भाजप नगरसेवकांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना उपलब्ध झाल्यामुळे पुणेकरांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी तथा डेटा उघड करणाऱ्यांची नावे जाहीर करावी, याकरिता आज मी स्वतः सायबर सेलच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांना समक्ष भेटून निवेदन दिले. त्यांच्याकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली”, अशी माहिती देखील त्यांनी दिली.


शेअर करा