नगरला डांबलेल्या ‘ त्या ‘ तरुणीच्या अपहरण नाट्याला वेगळेच वळण, आईच दवाखान्यात ऍडमिट

शेअर करा

लग्नासाठी माझ्या मुलीला एका तरुणाने डांबून ठेवले असल्याची तक्रार एका महिलेने नगर पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून त्या तरुणीला शोधून काढले मात्र पोलिसांसमोर येताच तरुणीने सांगितले की, माझे त्याच्यावर प्रेम आहे आणि मी माझ्या मर्जीने त्याच्यासोबत आले होते मुलीचे हे वाक्य ऐकताच सदर महिलेला धक्का बसला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. रविवारी रात्री साडे दहा ते साडे बाराच्या दरम्यान नगर शहरात हा प्रकार घडला.

उपलब्ध माहितीनुसार , अकोला येथील एका शिक्षिकेने रविवारी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली की माझी पंचवीस वर्षीय मुलगी पुणे येथे एका कंपनीत काम करते. तिने मला 19 मे रोजी रात्री फोन करून सांगितले की माझ्या मित्राने मला नगर शहरातील लाल टाकी येथे बोलावून घेतले व माझ्याशी लग्न कर, असे तो म्हणाला. मी नकार दिल्याने मित्र व त्याच्या तीन साथीदारांनी मला जबरदस्तीने पळवून नेऊन एका ठिकाणी डांबून ठेवले आहे असे बोलून तिने फोन बंद केला. त्यानंतर मी मुलीस अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तिने फोन घेतला नाही त्यामुळे माझ्या मुलीने लग्नास नकार दिल्यानेच तिला तिच्या मित्राने डांबून ठेवले आहे, अशा आशयाची फिर्याद या महिलेने दिली

पोलिसांनी तात्काळ सूत्रे फिरवत अपहरणाचा गुन्हा दाखल करत रविवारी त्या तरुणीचा शोध घेऊन दोघांनाही लालटाकी परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसांच्या समोर येताच मुलीने जबाब दिला की, मला कोणीही पळून आलेले नसून माझे या तरुणावर प्रेम असल्याने मी माझ्या मर्जीने आले आहे मुलीचे हे वाक्य ऐकताच तिच्या आईला मोठा धक्का बसला आणि त्या महिलेला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सदर तरुणीचा जबाब घेतल्यानंतर पोलिसांनी तिला सध्या स्नेहालय संस्थेत दाखल केले आहे तर तिच्या सोबत असलेल्या तरुणावर अद्यापपर्यंत तरी कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. सदर तरुण नगरमध्ये राहणारा असून पुणे येथे हे दोघे सोबत काम करत होते. या प्रेमप्रकरणाची नगर शहरात दोन दिवस चांगलीच चर्चा रंगली होती.

काय होती आईची तक्रार ?

विदर्भातील अकोला जिल्ह्यातील ही युवती पुण्यातील एका आयटी कंपनीत नोकरीला आहे. नगर येथील तिचा मित्र तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. तिने लग्न करावे म्हणून तिच्याकडे आग्रह धरीत होता. मात्र ती तरुणी त्याला नकार देत होती. यासंबंधी आरोपी याने तिच्या आईशीही बोलणे केले होते . मात्र तिने नकार दिल्याने २९ मे रोजी त्याने त्याच्या तीन मित्रांच्या मदतीने तरुणीला पुण्याहून नगरला आणले. तरीही ती लग्नाला नकार देत होती. त्यामुळे तिला त्रास दिला. लालटाकी भागात एका ठिकाणी तीन दिवस डांबून ठेवले.

आरोपीने तिचा फोटो काढून तिच्या आईला पाठविला. तरुणीने तिच्या आईशी संपर्क साधला. मी अडचणीत आहे, एवढेच तिला बोलू दिले. त्यानंतर आरोपींनी तिच्याकडून मोबाईल काढून घेतला, अशी फिर्याद पोलिसांना देण्यात आली होती . पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि तातडीने तपास सुरू केला. आरोपीस पकडण्यात आले आणि तरुणीला डांबून ठेवलेल्या ठिकाणी जाऊन तिची सुटका करण्यात आली. सुमारे तीन दिवसांनंतर तिची सुटका झाली मात्र मुलीचे वेळेला आरोपीचीच बाजू घेतल्याने आईला मोठा मानसिक धक्का बसला आणि ऍडमिट करण्याची वेळ आली.


शेअर करा