‘ इथंच करमतयं ‘ रिपोर्ट निगेटिव्ह येऊनही आजीबाई घरी जाईनात

शेअर करा

कोरोनाबद्दल रुग्णांच्या मनात भीती असल्याने टेस्ट म्हटलं तरी घाबरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये कोविड सेंटरमध्ये असलेली एक आजी तिथून जायला तयार नाही. विशेष म्हणजी आजीची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. आजी कोविड सेंटरमधल्या वातावरणात इतकी रमली की निगेटिव्ह आल्यानंतर जेव्हा घरी जायची वेळ आली तेव्हा जाणारच नाही असे त्यांनी सांगितले. कोल्हापूरपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या राजर्षी शाहू आश्रम शाळेतल हे कोविड सेंटर आहे.

कोविड सेंटरची सुरुवात 14 मे रोजी करण्यात आली. शाळेच्या 9 खोल्या वापरात असून दोन हॉस्टेलसुद्धा आहे. सध्या 100 लोकांसाठी हे सेंटर चालवले जात आहे. मात्र याठिकाणी 200 जणांची सोय होऊ शकते अशी माहिती रुपेश पाटील यांनी दिली. बरे होणारे रुग्ण आणि नव्याने येणारे रुग्ण संपर्कात येणार नाहीत याची पुरेपूर काळजी याठिकाणी घेतली जाते. सध्या बाहेरील कोरोनामुळे परिस्थिती बिकट आहे. या परिस्थितीचा तणाव मात्र कोरोना सेंटरमध्ये दिसत नाही. तिथं दाखल होणाऱ्यांना बाहेर काय चाललं आहे, याची माहिती दिली जात नाही. कोरोनाबाबत निगेटिव्ह गोष्टी कानावर पडू नयेत. त्यांना भीती वाटू नये यासाठी कोविड सेंटरमधील लोक प्रयत्न करतात.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ज्या रुग्णांना कोविड सेंटरमध्ये आणले जाते त्यांना इथे आल्यावर वाटत नाही की ते रुग्ण आहेत. त्यांना खोलीतून बाहेर पडण्याची मुभा आहे. शेतात फिरू शकतात, तसंच त्यांना कोविड सेंटरजवळ असलेल्या बागेत श्रमदान करता येते, फिरता येते. त्यामुळे कुठेही आपण रुग्ण आहोत, आपल्याला काहीतरी झालंय ही भावना त्यांच्या मनात राहू नये याकडे लक्ष दिले जात असल्याचं संभाजी ब्रिगेड कोविड सेंटरचे रुपेश पाटील यांनी सांगितले.

रुग्णांवर उपचार सुरु असताना त्यांना भात, भाजी, भाकरी, चपाती असे घरी तयार केलेले जेवण देण्यात येते. याशिवाय सकाळी नाश्ताही देण्यात येतो. आठवड्यातून एकदा मांसाहार आणि दररोज अंडी दिली जातात. जे अंडी खात नाहीत त्यांना फळे देण्यात येतात असे कोविड सेंटरच्यावतीने सांगण्यात आले आहे. दररोज सकाळी सात वाजता रुग्णांसाठी मेडिटेशन, योगासने, श्वसनाचे व्यायाम घेतले जातात. त्यासाठी संबंधित क्षेत्रातील जाणकार, तज्ज्ञांना बोलावण्यात येते. सकाळी सात वाजल्यापासून अर्धातास मेडिटेशन झाल्यानंतर योगाभ्यास होतो. त्यानंतर नाश्ता झाला की 9 च्या सुमारास बागेतच लहान झाडांची निगा राखण्याचं काम काही रुग्ण स्वेच्छेनं करतात असं रुपेश पाटील म्हणाले.

कोरोना झालेल्या रुग्णांच्या तणामुक्तीसाठी लाफ्टर थेरपीचा वापर सेंटरमध्ये करण्यात येतो. हसण्यामुळे त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि ऑक्सिजन पातळी योग्य राखण्यासाठी मदत होते. तसंच रुग्णही तणावमुक्त राहतात. सध्या सेंटरमध्ये जवळपास 80 च्या आसपास रुग्ण आहेत. आतापर्यंत 50 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. सरकारच्या प्रोटोकॉलनुसार रुग्णांना औषधोपचार केले जातात. त्यांना वेगळी अशी कोणतीच औषधे दिली जात नाहीत.

इथे उपचार घेणाऱ्यांनी अशा भावना व्यक्त केल्या की, ‘आम्ही योगासनं कधी केली नव्हती. इथं येऊन केली. कोविड सेंटरला यायच्या आधी आपल्याला बरंच काही झालंय असं वाटायचं, मला काहीतरी होणार ही भावना मनात असायची. मात्र इथं आल्यावर यातलं काहीच झालं नाही.’ कोविड सेंटरला आल्यावर रुग्णांना काही झालंय अशी वागणूक त्यांना कधीच दिली नाही. तुम्ही सुरक्षित आहात हे पटवून दिलं. आजाराबद्दल मनात झालेली भीती काढून टाकली आणि त्यांना मानसिक आधार दिला असेही रुपेश पाटील म्हणाले.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या आजीच्या व्हिडिओबाबत रुपेश पाटील यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की, इथं आजीच नाही तर अनेकजण आहेत जे 14 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाल्यानंतरही घरी जायला तयार नाहीत. ते आणखी एक दोन दिवस हट्ट करतात. त्यांना समजावून घरी गालवालं लागतं. माझ्या घरी रहा पण सेंटरमधून बाहेर पडा, इतर रुग्णांना उपचार द्यायचे आहेत अशी विनंती केल्यानंतर लोक जातात. बऱ्या झालेल्या रुग्णांना फेटा बांधून, हालगी वाजवून, टाळ्या वाजवून निरोप दिला जातो.


शेअर करा