पेट्रोल डिझेल पुन्हा महागले, असा जाणून घ्या आपल्या शहरातील दर ?

शेअर करा

बेरोजगारी आणि वाढती महागाई अशा दुहेरी संकटाचा सध्या देशातील नागरिक सामना करत आहेत . केंद्राकडून दिलासा मिळण्याची काहीच आशा दिसत नसताना नागरिकांच्या चिंतेत इंधन दरवाढीमुळे आणखी भर पडताना दिसत आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज नवनवे उच्चांक प्रस्थापित करताना दिसत आहे.

मुंबईत सोमवारी पेट्रोलच्या दरात 27 पैसे आणि डिझेलच्या दरात 19 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे पेट्रोलचा प्रतिलीटर दर 107.20 आणि डिझेलची प्रतिलीटर किंमत 97.29 रुपयांवर जाऊन पोहोचली. कोलकाता आणि दिल्लीतही इंधनाच्या दरांचा भडका उडाला आहे. वाढत्या इंधन दरामुळे महागाई देखील वाढत चाललेली आहे मात्र केंद्र व राज्य सरकार देखील काहीच उपाययोजना करायला तयार नाही. देशातील बहुतांश शहरात पेट्रोलचे दर हे १०० पार झालेले आहेत.

काल देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. तर 10 जुलैला पेट्रोलच्या दरात 35 पैसे आणि डिझेलच्या दरात 26 पैशांची वाढ झाली होती. सध्याची परिस्थिती पाहता डिझेलही लवकरच शंभरी ओलांडण्याची चिन्हे दिसत आहेत.डिझेलच्या वाढत्या दरामुळे भाजीपाला याचसोबत अनेक जीवनावश्यक वस्तू देखील महाग होत चाललेल्या आहेत.

पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर 4 मे पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढायला सुरुवात झाली होती. पेट्रोलने शंभरी गाठलेल्या देशातील प्रमुख शहरांमध्ये मुंबई, रत्नागिरी, पुणे, नगर, औरंगाबाद, जैसलमेर, गंगानगर, हैदराबाद, लेह, बसवाडा, इंदौर, जयपूर, भोपाळ, ग्वाल्हेर, गुंटुर, काकिनाडा, चिकमंगळुरू, शिवामोग्गा आणि चेन्नईचा समावेश आहे.

केंद्र सरकारने मार्च 2020 ते मे 2020 या पेट्रोवरील सेस आणि सरचार्जमध्ये 13 रुपये तर डिझेलवरील सेल आणि सरचार्जमध्ये तब्बल 16 रुपयांची दरवाढ केली आहे. चालू आर्थिक वर्षातील परिस्थिती पाहता पेट्रोल-डिझेलची मागणी 14 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. मात्र इंधनाच्या दरात कपात न झाल्यास ही मागणी 13 टक्क्यांपर्यंत खाली घसरेल. 2021 मध्ये आतापर्यंत पेट्रोलची मागणी 10.6 टक्क्यांनी घटली आहे. तर इंधनावरील करापोटी केंद्र सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नात 55 टक्क्यांनी वाढ होऊ ते 3.5 लाख कोटी इतके झाले आहे.

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता. आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.


शेअर करा