“शरद पवारांचे वसुली एजंट अनिल देशमुख तर उद्धव ठाकरेंचे अनिल परब, दोघेही एक दिवस तुरुंगात जाणार”

शेअर करा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुली प्रकरणात सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने मोठी कारवाई केली आहे. देशमुख यांनी 4 कोटी 20 लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. या कारवाईवरुन भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देशमुखांवर जोरदार निशाणा साधला आहे . त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांची 2010 ची मालमत्ता ईडीने शोधून काढली आहे. आता हळूहळू 2020 आणि 2021 ची मालमत्ताही सापडेल, असा टोला सोमय्या यांनी लगावला असू त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे

अनिल देशमुख यांनी हा काळा पैसा आपल्या चॅरिटेबल ट्रस्ट, एज्युकेशन ट्रस्ट, कंपन्यांमध्ये गुंतवला होता. त्यावर ईडी लवकरच कारवाई करण्याची शक्यता आहे. सचिन वाझे हा सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्यासाठी काम करायचा. त्यानंतर परमबीर सिंग, अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्यासाठी काम करायचा, असा दावा त्यांनी केलाय. इतकंच नाही तर शरद पवार यांचे वसुली एजंट अनिल देशमुख आहेत. तर उद्धव ठाकरे यांचे एजंट अनिल परब असल्याचा गंभीर आरोपही सोमय्या यांनी केला आहे.

अनिल देशमुख आणि अनिल परब हे दोघेही एकदिवस तुरुंगात जाणार, असा दावा सोमय्या यांनी केला आहे. अनिल देशमुख सध्या सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत ते शेवटच्या क्षणापर्यंत वाचण्याचा प्रयत्न करतील. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हाकलून दिल्यानंतर त्यांना ईडीकडेच जावं लागणार आहे. आपल्याला माहिती आहे की, हायकोर्टाने सांगितलं आहे की तपासाची व्याप्ती वाढवा. तर दुसरीकडे राज्य सरकार, अनिल देशमुख रोज एक पिटीशन टाकत आहेत आणि तपास थांबवा असं सांगत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

अनिल देशमुखांची कोणत्या संपत्तीवर जप्तीची कारवाई?

अनिल देशमुख यांच्या वरळीमधील सुखदा या इमारतीमधील डुप्लेक्स फ्लॅटपैकी एक फ्लॅट जप्त करण्यात आला आहे. हा प्लॅट देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांच्या नावावर आहे. या फ्लॅटची किंमत 1 कोटी 54 लाख रुपये आहे. दुसरीकडे उरणजवळील धुतूम गावात देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांच्या कंपनीकडून जमीन खरेदी करण्यात आली होती. त्या जमिनीतील काही फ्लॅटवर ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. या जमिनीची किंमत 2 कोटी 67 लाख रुपये आहे. त्याचबरोबर देशमुख यांची नागपुरातील काही मालमत्ताही सील करण्यात आल्याचं बोललं जात आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणात देशमुखांवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.


शेअर करा