नगर पाठोपाठ ‘ ह्या ‘ जिल्हयातूनही पंतप्रधानांना शेणाच्या गोवऱ्या पार्सल

शेअर करा

नगरमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेणाच्या गोवऱ्या पाठवल्यानंतर त्याच प्रकारे आता सोलापूर येथून देखील मोदी यांना शेणाच्या गोवऱ्या पाठवण्यात आल्या आहेत .इंधनाची वाढती दरवाढ आणि महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. या वाढत्या महागाईचा निषेध म्हणून सोलापूरच्या महिला काँग्रेसनेही वाढत्या महागाईवर संताप व्यक्त करत थेट पंतप्रधान कार्यालयाला शेणाच्या गोवऱ्या पार्सल पाठवल्या आहेत.

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज महिला काँग्रेस आणि युवक काँग्रेसने सोलापुरात पेट्रोल पंपावर वाढत्या महागाईच्या विरोधात निदर्शने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निवासस्थान असलेल्या 7 रेसकोर्सवर महागाईचा निषेध म्हणून शेणाच्या गोवऱ्या पाठवण्यात आल्या आहेत. आंदोलनाच्या वेळी महिलांचा मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

प्रणिती शिंदे म्हणाल्या , ‘ सिलेंडरचे दर वाढल्यामुळे आमच्यावर चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे बेरोजगारी वाढल्याने युवकांची अडचण झाली आहे. सर्वसामान्यांवर लॉकडाऊनचे संकट असताना इंधन दरवाढ करून केंद्र सरकारने सामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यामुळे आम्ही देशभर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहोत ‘

‘ कोरोना संकटात मोदी सरकारने योग्य नियोजन केलं असतं तर इतके लोक मृत्यूमुखी पडले नसते. सगळ्या बाजूने सरकारची कोंडी झाली आहे. या संपूर्ण प्रकरणावर मोदी सरकारची बोलती बंद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. ते मीडियासमोर यायला घाबरत आहेत ‘


शेअर करा