ब्रेकिंग ..माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात : कुठे घडली घटना ?

शेअर करा

करोना साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यात दौरा करत असलेले माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील एका वाहनाचा आज अपघात झाला. ही घटना आज रात्री आठ वाजता जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद गावाजवळ घडली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज नाशिकमध्ये होते. नाशिक जिल्ह्याचा दौरा आटोपून ते भाजपचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी आज रात्री यावल तालुक्यातील भालोद या गावी निघाले होते मात्र नशिराबाद गावाजवळ मुसळधार पावसामुळे त्यांच्या ताफ्यातील एका वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते वाहन पुढील वाहनाला धडकले. त्यात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर बसलेले होते. मोठ्या ताफ्यातील दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले. मात्र या अपघातानंतर प्रवीण दरेकर हे ताफ्यातील इतर वाहनात बसून निघून गेले.

” नाशिक आणि मालेगावचा दौरा आटोपून आम्ही जळगावकडे जात असताना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वाहनाला किरकोळ अपघात झाला आहे. स्वतः प्रवीण दरेकर आणि इतरही सर्वच जण सुरक्षित आहेत. काळजी करण्यासारखे काहीही नाही ” अशी माहिती फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

ह्या घटनेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी भालोद येथे जाऊन माजी खासदार हरिभाऊ जावळे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. हरिभाऊंच्या जाण्याने भाजपची मोठी हानी झाली आहे, आम्ही तुमच्या कुटुंबाच्या पाठिशी आहोत, अशा भावना देखील त्यांनी व्यक्त केल्या.


शेअर करा