ज्योती देवरे ऑडिओ क्लिप : नगर जिल्हाधिकारी कार्यालयातून सूत्रे हलली त्यानंतर …

शेअर करा

आत्महत्येचा इशारा देत अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात यामुळे खळबळ उडाली. या प्रकरणी आता महत्त्वाची अपडेट आली आहे. अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी या क्लिपच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली असून या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सदर प्रकरणाच्या चौकशी समितीच्या उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मल या अध्यक्ष असून उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील आणि तहसीलदार वैशाली आव्हाड या सदस्य आहेत.

व्हायरल क्लिपमध्ये ज्योती देवरे यांनी अधिकारी म्हणून होणारा त्रास, एकतर महिला त्यात जातीने मराठा म्हणून ऍट्रॉसिटीच्या कायद्याची दाखवण्यात येणारी भीती, वरिष्ठांकडून केले जाणारे दुर्लक्ष, नोकरीत येताना केलेला निर्धार आणि प्रत्यक्षात झालेली निराशा असे सविस्तर कथन त्यांनी या क्लीपमध्ये केले आहे . ऑडिओमध्ये बोलताना मधून मधून त्या रडताना देखील ऐकू येत आहे. क्लिमधील मजकूर मात्र अत्यंत गंभीर आहे. देवरे यांच्या निशाण्यावर असलेले आमदार निलेश लंके यांनी या प्रकरणात प्रथमच आपली बाजू देखील मांडली आहे .

काय म्हणाले निलेश लंके ?

गेल्या दोन दिवसात ज्योती देवरे यांची जी क्लिप वायरल झाली आहे त्यात मी सांगू इच्छितो की त्यांनी स्वतःच्या बचावासाठी केलेला हा केविलवाणा प्रयोग आहे. तुम्ही पाहिला असेल आठ दिवसांपूर्वी त्यांच्यावर काही गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले आहेत तसा अहवाल सुद्धा नाशिक विभागीय आयुक्त साहेब यांनी मुंबईला पाठवलेला आहे आणि या आधी सुद्धा त्यांनी केलेल्या कामात ज्यावेळेस चुकीच्या गोष्टी झाल्या. भ्रष्टाचाराच्या घटना माझ्यासमोर आल्या आणि त्यामुळे मी त्यांना सूचित करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी मला रात्री अपरात्री मेसेज करून सांगितले की, जर तुम्ही ह्या गोष्टी उघडकीस केल्या तर मी आत्महत्या करेल करेल, असे आतापर्यंत बरेच प्रकार झालेले आहेत. ज्या विभागात त्या काम करतात त्या विभागातील सर्व अधिकाऱ्यांना आपण साधू संत असल्याचा आव आणत इतर सर्व जण जणू चुकीचेच काम करतात असे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो . त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले आहेत आणि त्याची चौकशी सुद्धा चालू आहे. स्वतःच्या बचावासाठी केलेला त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.

काय आहे व्हायरल क्लिप मधील मजकूर ?

दीपाली ( मयत दीपाली चव्हाण यांना उद्देशून ) तू हे कृत्य केल्याचे मला तेव्हा आवडले नव्हते. पण आता एकूण त्रास लक्षात घेता तुझ्याच पाठी यावे, असे वाटत आहे. महिला अधिकारी म्हणून लोकप्रतिनिधी त्रास देतात, प्रशासनातील वरिष्ठही हतबल असतात. लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या झुंडी सतत धावून येतात. त्यांना रोखता येत नाही आणि वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडीत रोखता येत नाही. त्यांनी तर खिंडीत मदत पोहचविण्याऐवजी मारेकरी पोहचविले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एका रथाची दोन चाके आहेत. मात्र, आपल्या चाकाने गती घेतली की घात झालाच समजा. कारण महिलांनी मागे राहणे हेच मनूने शिकविले. हे सगळे मनूचे अनुयायी आहेत. मग एकटीने वाट कशी चालायची? दीडशहाणी, आगाऊ अशी विशेषणे लावली जाणार. जो पर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत आपल्याविरूद्ध उपोषण, मोर्चे, आंदोलने घडवून आणणार .

स्त्री जातीचा उजेड त्यांना सहन होत नाही. आंदोलनांवर नाही भागले तर तर विधानसभेत प्रश्न मांडायचा, जुन्या चुका उकरून काढून त्याचे भांडवल करायचे. मग चौकशांच्या जात्यातून जावे लागते. एवढे सहन करण्याची ताकद महिलांमध्ये कुठे आहे? मोठी जबाबदारी संभाळताना एखादी चूक होऊ शकते, मात्र महिलेला माफी नाही कारण अहिलेलासुद्धा माफी नव्हती. दीपाली, तुझ्या मार्गावर निघण्यापूर्वी मी घाई करतेय असे वाटत आहे. पण मी जरा कायद्याच्या वाटेने जाऊन पाहिले. खंडणी मागणाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला. तेव्हा मला वाटले आता माझ्या धाडसाचे कौतूक होईल. मला म्हणतील ओ शेठ तुम्ही नादच केला थेट. अशा थाटात सर्व अधिकारी वर्ग माझे जंगी स्वागत करतील. पण छे, असे काही झालं नाही. शेठ हे फक्त पुरूषला म्हणतात. बायांना कठे शेठ म्हणता येते ?

लहानपणी मला धीर देणारे माझे आजोबा होते. पुराणातील दाखले देत मला म्हणायचे हे पहा पोथ्या वाचून तुझे नाव ज्योती ठेवले आहे. अंधारात डगमगायचे नाही. त्यातून मला जिद्ध मिळाली. आता असे कोणी उरले नाही. आता एकदाची निघून जावे वाटते सुसाईट नोटमध्ये यांची सर्वांची नावे लिहून ठेवावीत. पण पुन्हा वाटते की अरे ती सुसाईट नोट कोर्टाने खोटी ठरविली तर? मग हिरा बनसोडे सारखे फिर्याद कोणाकडे द्यायची? कधी वाटते बंदुक घेऊन सुसाट पळावे यांच्या मागे. पण नंतर वाटते पोथ्यांत सांगितले आहे तसे यांना माफ करावे.

मी दुकानदारांचे लसीकरण करून घेतले म्हणून लोकप्रतिनिधींना राग आला. त्यांनी रात्रीच आरोग्य केंद्रात जाऊन महिला आरोग्य अधिकाऱ्याला खोदून खोदून विचारले. त्यांच्या एका लिपिकाला मारहाण केली. ती महिला अधिकारीही माझ्यासारखीच. तीही रडू लागली. तिच्यावर हात साफ करता आला नाही, म्हणून लोकप्रतिनिधींनी लिपिकाला बदडून काढले. मी त्या महिला अधिकाऱ्यांना वरिष्ठांना सांगण्याचा सल्ला दिला. पण वरिष्ठ महिला नव्हते. त्यामुळे त्यांनी महिलेची बाजू घेतली नाही. उलट काही वेळातच त्या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ समोर आला की मला लोकप्रतिनिधींनी मारले नाही. त्यामुळे महिला अधिकाऱ्यांना कोणीही वाली नाही. त्यांनी ड्रॉवरमध्ये सुसाईट नोट ठेवूनच काम करायचे. या सगळ्यांची नावे मी मुद्दाम घेतली नाहीत. ते पुरुष असले तरी कोणाचे तरी पती, भाऊ, मुलगा आहेत. ते आत गेले तर माझ्या त्या महिला भगिनी उघड्यावर येतील. ज्यांनी त्रास दिला ते मनातून समजून जातील.


शेअर करा