यवतमाळकर महिलेच्या गोड आवाजाने डॉक्टरला ‘ याड ‘ लागलं , प्रत्यक्षात भेट मात्र..

शेअर करा

सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण करुन चक्क दोन कोटी रुपयांना दिल्ली येथील एका डॉक्टराची फसवणूक झाल्याची घटना यवतमाळ येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच अवघ्या 24 तासांच्या आत गुन्ह्याचा उलगडा करून आरोपीकडून रक्कम हस्तगत करण्यात यवतमाळ पोलिसांना यश आले आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून यवतमाळ येथील एका तरुणीने ( ? ) दिल्ली येथील नामांकीत डॉक्टरासोबत मैत्री पूर्ण संबंध प्रस्थापित केले. त्यांच्याकडून गोड गोड बोलत त्यांच्याकडून दोन कोटी रोख रक्‍कम, मौल्यवान दागिन्यांची भेट स्विकारली आणि त्यांनतर अकाऊंट अचानक बंद केले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने डॉक्टराने थेट यवतमाळ गाठत पोलीस अधिक्षक कार्यालयात येऊन आपली दुखभरी दास्तान सांगितली. पोलीस अधिक्षकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, यवतमाळ व सायबर सेल यांना घटनेची शहानिशा करुन आरोपी निष्पन्न करण्याबाबत आदेश देताच यंत्रणा कामाला लागली.

तपास सुरु असताना डॉक्टरची फसवणूक करणारी महिला नसून तो पुरुष असल्याची धक्कादायक माहिती हाती लागताच पोलिसांनी चक्रावले. अधिकारी व कर्मचारी यांचे पथक गठीत करुन स्थानिकांनी अरुणोदय सोसायटीतील एका घरी भाड्याने राहणाऱ्या इसमाच्या घरी धाड टाकली असता सदर ठिकाणी आरोपी संदेश अनिल मानकरकडून एक कोटी 72 लाख 7 हजार रुपये नगदी व चार लाख रुपयाचे सोन्याचे दागिने आणि चार विविध कंपनीचे मोबाईल फोन असा एकूण 1 कोटी 78 लाख 6 हजारांचा मुद्येमाल हस्तगत करण्यात यवतमाळ पोलिसांना यश आलं.

नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करतांना अनोळखी व्यक्तीवर त्वरीत विश्वास ठेवू नये, नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करतांना सावधगिरी बाळगावी, असं आवाहन यवतमाळ पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. गिफ्ट आलंय किंवा इतर कोणत्याही कारणासाठी कुणालाही आपली खाजगी माहिती शेअर करू नये. गेल्या काही वर्षांपासून सायबर सेलमध्ये अशाच स्वरूपाच्या तक्रारी येत असल्याने सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे .


शेअर करा