नाशिकमध्ये खाजगी हॉस्पिटलकडून रुग्णांची लूट ? आंदोलनाचा इशारा

नाशिक प्रतिनिधी भूषण चोभे यांचेकडून : रुग्ण व नातेवाईकांचा डॉक्टरांवर विश्वास असतो. वाजवी दरात योग्य उपचार होतील अशा आशेवर रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल केले जातात. मात्र काही ठिकाणी फसवणूक केली जाते. दि.१४ रोजी नाशिकमधील चिरंजीव हॉस्पिटलमध्ये गोरगरीब रुग्णांची अवाजवी लूट होत असल्याचे समोर आले. त्याबाबत ऑपरेशन हॉस्पिटल चळवळीने तातडीने दखल घेत विभागीय आरोग्य संचालकांना निवेदन दिले. यासंदर्भात त्वरित संबंधित हॉस्पिटलची चौकशी करण्यात यावी. गोरगरीब रुग्णांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा उग्र आंदोलन छेडावे लागेल असे कळविण्यात आले आहे.

शहरातील मुंबई नाका परिसरातील गैरप्रकारांविषयी यापूर्वीही तक्रारी आल्या होत्या.मात्र दि.१४ रोजी एका रुग्णाच्या नातेवाईकांनी अन्यायकारक बिलाविरोधात आवाज उठवला. त्याची दखल ऑपरेशन हॉस्पिटल चळवळीच्या कार्यकर्त्यांनी तत्परतेने घेतली. रोहन देशपांडे, अक्षरा घोडके व सहकाऱ्यांनी हॉस्पिटल गाठून वस्तुस्थिती जाणून घेतली. संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यांची कैफियत मांडली व अव्वाच्यासव्वा आकारणी केलेली बिले दाखवली. त्यांची वैद्यकीय क्षेत्रातील तज्द्य व जाणकार व्यक्तींकडून पडताळणी करण्यात आली. त्यांनीही प्रचंड तफावत व अवाजवी दर आकारणीबाबत दुजोरा दिला. त्यातून धक्कादायक बाबी समोर आल्या.

संबंधितांशी चर्चा करून तातडीने विभागीय आरोग्य संचालकांना निवेदन देण्यात आले. त्यावर मनसे सहकारचे प्रदेश उपाध्यक्ष रोहन देशपांडे, अक्षरा घोडके यांच्यासह कामिनी दोंदे,संदीप भवर, भाऊसाहेब निमसे, मनोज घोडके, प्रहार सेनेचे दत्तू बोडके तसेच जावेद शेख, प्रफुल्ल बनभेरू यांच्या स्वाक्षरी आहेत.आरोग्य उपसंचालक जी. डी. गांडळ यांनी चिरंजीव हॉस्पिटलची चौकशी केली जाईल व दोषी आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे, मनपा व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच मुंबईनाका पोलीस ठाणे यांना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये गोरगरीब रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना तातडीने न्याय मिळाला नाही तर निषेधात्मक आंदोलन केले जाईल असे बजावण्यात आले आहे.