नगर ब्रेकिंग..अखेर ‘ त्या ‘ तरुणाच्या बहिणीची पोलिसात फिर्याद, वरिष्ठांवर धक्कादायक आरोप

शेअर करा

नगर शहरानजीक एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटी क्लार्क म्हणून काम करत असलेल्या एका तरुणाने वरिष्ठ सहकाऱ्यांच्या या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नगर वांबोरी रोड वरील वांबोरी फाट्याजवळ शुक्रवारी रात्री नऊ ते अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, प्रतिक बाळासाहेब काळे ( वय 27 राहणार तेलकुडगाव तालुका नेवासा ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

घटनेनंतर मयत प्रतीक याची बहिण प्रतिक्षा बाळासाहेब काळे हिने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून, मुळा एज्युकेशन सोसायटीत काम करत असलेले महेश गोरक्षनाथ कदम, विनायक दामोदर देशमुख, राहुल जनार्धन राजळे, व्यंकटेश नामदेव बेलेकर, जगन्नाथ कल्याणराव औटी यांच्यासह मुळा सहकारी साखर कारखाना येथे नोकरीला असलेले रावसाहेब भिमराज शेळके व रितेश बबन टेमक यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्षा काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माझा भाऊ प्रतीक हा मुळा एज्युकेशन सोसायटी प्रामाणिकपणे काम करत होता त्यामुळे तो गडाख कुटुंबीयांचा देखील जवळचा होता, ही बाब आवडल्याने सात जण प्रतीकला सहा महिन्यांपासून सतत त्रास देत होते. ‘ तू इथे नोकरी करू नकोस आणि महाराष्ट्रात देखील थांबू नकोस’ , अशा धमक्या त्याला सातत्याने दिल्या जात होत्या. प्रतीक ज्या खानावळीत जेवण करत असायचा तिथे त्याचे जेवण देखील या सात जणांनी बंद केले होते, या त्रासाला कंटाळून प्रतीक याने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

आत्महत्या करण्यापूर्वी प्रतीक काळे याने शुक्रवारी आठ वाजून 45 मिनिटांनी त्याचा लहान भाऊ अक्षयच्या व्हाट्सअप वर व्हिडिओ पाठवला. त्यात त्याने अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा केला. त्याच्या कुटुंबीयांनी तात्काळ ही गोष्ट पोलिसांना सांगितली, त्यानंतर नेवासा तसेच एमआयडीसी पोलिसांनी त्याचा शोध घेतला मात्र रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झाडाला गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत प्रतीक आढळून आला, त्याची ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल होत आहे.


शेअर करा