काय चाललंय ? नगर जिल्ह्यात पुन्हा रस्त्यावर प्रसूती , तिसरी घटना

शेअर करा

नगर जिल्ह्यात एकीकडे आरोग्य सुविधांची कमतरता तर दुसरीकडे आरोग्य कर्मचाऱ्यांचे उद्धट वर्तन हे नागरिकांना चांगलेच परिचयाचे झालेले आहे. देवळाली प्रवरा आणि कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे महिलांना चक्क रस्त्यावर प्रसूती करण्याची वेळ आली होती, या दोन्ही घटना ताज्या असतानाच आता आणखी एक घटना समोर आली असून मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास कोपरगाव शहरातील साईबाबा तपोभूमी परिसरात संजीवनी कारखान्याच्या प्रवेशद्वार परिसरात राहणाऱ्या एका महिलेला वेळेत आरोग्यसेवा न मिळाल्याने तिने उघड्यावर बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, वैशाली भागवत कापडे ( बय 26 राहणार कोल्हे कारखाना प्रवेशद्वार परिसर ) असे या महिलेचे नाव असून त्यांना सोमवारी रात्री प्रसूती कळा येण्यास सुरुवात झाली होती त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना मध्यरात्री एकच्या सुमारास कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेले आणि डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात पाठवले.

खाजगी रुग्णालयात पाठवल्यानंतर खाजगी रुग्णालयाने पुन्हा काही तपासण्या करून त्यांना लोणी येथील प्रवरा शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला मात्र रुग्णांकडे आर्थिक अडचण असल्या कारणाने ते महिलेला घरी घेऊन गेले.

सकाळी पुन्हा प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर गर्भवती महिलेला पुन्हा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले त्यानंतर तेथील डॉक्टरांनी पुन्हा तपासणी करून महिलेला खासगी रुग्णालयात हलवण्याची तयारी सुरू केली होती मात्र दरम्यान खासगी रुग्णालयात नेले जात असताना साईबाबा तपोभूमी परिसरात महिलेला प्रसूती महिलेच्या प्रसूती वेदना तीव्र होऊ लागल्याने काही नातेवाईकांनी येथील एका महिलेच्या मदतीने रस्त्यावरच प्रसूती केली त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात महिलेला दाखल करण्यात आले. बाळ आणि बाळंतीण सुखरूप असल्याचे समजते.

आरोग्य अधिकारी आणि आरोग्य सेवक हे देखील सातत्याने रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या सुविधांविषयी खाजगीत बोलताना, ‘ जर सुविधाच नाही तर आम्ही करणार तरी काय ? असा प्रश्न उपस्थित करतात. सरकारी पातळीवर देखील शासकीय रुग्णालयात चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि विविध तपासण्यांसाठी नागरिकांना खाजगी लॅबची पायरी चढण्याची वेळ येऊ नये यासाठी कुठलेच प्रयत्न होताना दिसत नाहीत त्यामुळे नागरिकांची अवस्था मात्र मुकी जनावरे कुणीही हाका अशी झालेली पाहायला मिळते आहे.


शेअर करा