अंजनाबाई गावीत आणि तिच्या मुलींचे पूर्ण प्रकरण नक्की काय आहे ?

शेअर करा

1996 साली महाराष्ट्रात धक्कादायक अशी घटना उघडकीस आली होती. अंजनाबाई गावित व तिच्या दोन मुली सीमा गावित आणि रेणुका शिंदे यांच्या क्रूरतेच्या कथा ऐकून समाजमन सुन्न झाले होते. मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी या दोघींच्या फाशीच्या शिक्षेत कपात करून त्यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

2001 मध्ये दोन्ही बहिणींना कोल्हापूर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती त्यांच्या या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने 2004 साली शिक्कामोर्तब देखील केले होते पुढे राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज पाठवण्यात आला त्यावरील निर्णय घेण्यास विलंब झाल्यामुळे या दोघींच्या फाशीच्या शिक्षेत कपात करून मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठेवण्यात आलेली आहे.

काय आहे प्रकरण ?

सध्या फाशीची शिक्षा ठोठावलेल्या सीमा आणि रेणुका यांची आई असलेली अंजनाबाई गावीत हिला चोरीची सवय होती. तिने तिचे हेच कौशल्य तिच्या मुलींना देखील शिकवले आणि त्यातून या त्रिकुटाने पाकीटमारी, किरकोळ चोऱ्या असे उद्योग सुरू केले. अंजनाबाई ही विवाहित होती मात्र सदर चोऱ्यांमुळे तिचे आणि तिच्या पत्नीचे भांडण होऊ लागले आणि तिचा पती मोहन गावित याने तिला सोडून दिले.

मोहन याने दुसरा विवाह केला आणि त्यातून त्याला एक मुलगी झाली मात्र पतीने आपल्याला सोडून दिल्यामुळे त्याचा बदला घेण्याची खुमखुमी अंजनाबाई तिच्या मनात होती त्यातून तिने मोहन गावीत याला दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या मुलीचे अपहरण करण्याचा प्लॅन केला आणि तिचे अपहरण केले मात्र त्याआधी देखील त्यांनी अनेक गुन्हे अशाच पद्धतीने केले होते. चिमुकल्यांना वेठीस धरून त्यांनी चोऱ्या करायला भाग पाडले आणि त्यानंतर त्यांचे खून केले.

1995 मध्ये तिघी जणींनी कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकात भीक मागणार्‍या एका महिलेचे राजा नावाचे बाळ चोरले होते त्यानंतर दीड वर्षाचा संतोष, अंबाबाई मंदिरातून भाग्यश्री पाटील अशा अनेक बालकांचे त्यांनी अपहरण केले त्यानंतर त्यांचा पाकीटमारीसाठी वापर केला आणि पैसे हाती आल्यानंतर त्यांचा क्रूरपणे खून केला. अंजनाबाई ही मुलांच्या मानेवर पाय देऊन त्यांना चिरडून मारत होती अशी ही बाब तपासादरम्यान समोर आली होती.

सातत्याने अशा पद्धतीने गुन्हे करणाऱ्या गुन्हे करण्यास सोकावलेल्या या त्रिकुटाला मोहन गावीत याला दुसऱ्या पत्नीपासून झालेले मुलगी क्रांती हिचे अपहरण मात्र चांगलेच भोवले आणि त्यांना या प्रकरणात गजाआड व्हावे लागले. मोहन गावित याने आणि त्याच्या पत्नीने आपल्या मुलीचे अपहरण अंजनाबाई हिनेच केले असावे याची खात्री होती. तपासादरम्यान तोच धागा धरून पोलिसांनी तपास केला असता अंजनाबाई आणि तिच्या मुलींनी तब्बल 43 बालकांचे अपहरण केल्याचे पोलीस तपासात उघड झाले मात्र 13 मुलांचे अपहरण आणि सहा मुलांची क्रूर हत्या केली, इतकेच पुरावे पोलिसांना जमा करण्यात यश आले आणि अंजनाबाई हिच्यासह तिच्या दोन्ही मुलींना अटक करण्यात आली.

तपासादरम्यान पोलिसांनी प्रथम अंजनाबाई हिची मुलगी असलेल्या रेणुकाचा नवरा किरण शिंदे याला अटक केली आणि त्याला माफीचा साक्षीदार करण्यात आले. त्यांच्या घरात हरवलेल्या मुलांचे अनेक कपडे सापडले तसेच अनोळखी मुलांचे फोटो देखील हाती आले. त्यानंतर सीमा हिने तपासादरम्यान क्रांतीचे अपहरण आणि तिची हत्या आईच्या सांगण्यावरून केल्याचे पोलिसांना सांगितले.

अटक केल्यानंतर अवघ्या एक वर्षातच अंजनाबाई ही कारागृहात नैसर्गिकरित्या मयत झाली आणि तिच्या दोन्ही बहिणींवर खटला सुरू होता. कोल्हापूर सत्र न्यायालयाने रेणुका आणि सीमा या दोघींना 28 जून 2001 रोजी फाशीची शिक्षा सुनावली त्यानंतर 2004 मध्ये मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांनीदेखील फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले होते मात्र दया अर्जावर निर्णय घेण्यास उशीर करण्यात आल्याने त्यांना आता मरेपर्यंत जन्मठेप ही शिक्षा देण्यात आलेली आहे.

सुप्रीम कोर्टाने मायलेकींना फाशीची शिक्षा सुनावली मात्र अंमलबजावणी होऊ शकली नाही. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 2014 मध्ये त्यांचा दया अर्ज फेटाळला होता. दया अर्ज तीन महिन्यात निकाली काढणे आवश्यक असताना राष्ट्रपतींनी त्या अर्जावर निर्णय घेण्यास तब्बल पाच वर्षे घेतल्याने निर्णयात झालेल्या विलंबाचा लाभ देऊन फाशी माफ करण्याची मागणी आरोपींनी केली होती.


शेअर करा