संजय राऊत यांच्यावरील कारवाईवर बाळासाहेब थोरात म्हणतात की..

शेअर करा

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर अटक केलेली असून चार ऑगस्टपर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या सर्व प्रकारावर आपले मत व्यक्त करताना, ‘ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यामुळे जो काही गोंधळ निर्माण झाला त्यामुळे भाजप आणि राज्यपाल यांच्यावर महाराष्ट्रातील जनता शिंतोडे उडवत आहे त्यातून निसटण्यासाठी भाजपचा हा प्रयत्न आहे ,’ असे म्हटले आहे

संगमनेर येथे बोलताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, ‘ भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावरून उठलेल्या गोंधळातून निसटण्यासाठी ही कारवाई करण्यात आलेली आहे. संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईबद्दल मी कसा पाहतो यापेक्षा महाराष्ट्र आणि देशातील जनता कशी पाहते हे जास्त महत्त्वाचे आहे.

देशातील तपास यंत्रणांचा वापर हा देशाच्या हितासाठी न करता राजकारणासाठी केला जातोय हे आता लपून राहिलेले नाही. एखादी गोष्ट हट्टाला पेटल्यासारखीच जाणीवपूर्वक केली जात आहे. राज्यपालांचे वक्तव्य हे समाजातील बंधुभाव आणि एकोपा यात विभाजन करणारे असून जनतेच्या आता ही खेळी लक्षात आलेली आहे. भाजपा आणि राज्यपाल यांच्यावर जे शिंतोडे महाराष्ट्रातील जनता उडवत आहे त्यातून निसटण्यासाठी ही कारवाई करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तपास यंत्रणेचा राजकारणासाठी दुरुपयोग होत आहे असेच जनता याला म्हणत आहे, ‘ असेही ते पुढे म्हणाले.


शेअर करा