हिटलरदेखील निवडणुका जिंकायचा कारण.. , राहुल गांधींचे मोदींना खुले आव्हान

शेअर करा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महागाई बेरोजगारी आणि जीएसटीच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर जोरदार टीका करत देशात लोकशाहीचा मृत्यू होत असून सध्या केवळ चार लोकांची हुकूमशाही देशात सुरू आहे, असे म्हटले आहे. देशाने 70 वर्षात जे कमावले ते मोदी सरकारने केवळ आठ वर्षात गमावले असा देखील घणाघाती प्रहार त्यांनी केलेला आहे. काँग्रेसच्या देशव्यापी आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी मोदी भाजप आणि आरएसएसवर अनेक आरोप केले आहेत.

काय म्हणाले राहुल गांधी ?

देशातील लोकशाहीचा मृत्यू होत असून देशाने गेल्या सत्तर वर्षात जे कमावले ते केवळ आठ वर्षात गमावलेले आहे. देशात सध्या लोकशाही नसून केवळ चार लोकांची हुकुमशाही आहे. काँग्रेस पक्ष महागाई, बेरोजगारी आणि सामाजिक हिंसेचा मुद्दा उपस्थित करून पाहत आहे मात्र आम्हाला संसदेच्या आत आणि बाहेरही बोलू दिले जात नाही.

सध्याचे केंद्र सरकार हे केवळ दोन तीन मोठ्या उद्योगपतीसाठीच काम करत आहे . मी खरे बोलतो आणि मी जेवढे खरे बोलतो तेवढे माझ्यावर जास्त हल्ले होतील तरीदेखील महागाई आणि बेरोजगारीवर मी सातत्याने बोलत राहणार आहे. मी कोणाला घाबरत नाही. जे घाबरतात तेच धमकावतात. आपण दिलेली आश्वासने पूर्ण करू शकलेलो नाही हे पंतप्रधान मोदी यांना माहीत आहे म्हणून धमकावण्याचे उद्योग त्यांच्याकडून सुरू आहेत.

देशातील प्रत्येक घटनात्मक संस्था आणि प्रसारमाध्यमांवर भाजप आणि आरएसएस यांचे नियंत्रण असल्याने विरोधकांचा आवाज जनतेपर्यंत पोहोचत नाही. विरोधक संस्थांच्या जोरावर सत्ताधार्‍यांच्या विरोधात लढत असतात मात्र सध्या देशातील न्यायव्यवस्था, निवडणूक यंत्रणा आणि प्रसारमाध्यमे यांच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशातील कोणतीही संस्था आता स्वतंत्र राहिली नाव नसून प्रत्येक संस्थेत संघाचा माणूस नेऊन बसवलेला आहे त्यामुळे विरोधकांनी काहीही केले तरी त्याचे परिणाम दिसत नाहीत.

महागाई नसल्याचे दावे केंद्र सरकारकडून केले जात आहेत मात्र देशात सर्वाधिक महागाई बेरोजगारी सध्या असून तुम्ही खेडेगावात गेलात तर तुम्हाला यासंदर्भात भीषण वास्तव समोर दिसेल मात्र हे सरकार सत्य परिस्थिती मान्य करण्याची तयारीच दाखवत नाही. कोरोनामध्ये लाखो लोक मृत्युमुखी पडले मात्र सरकारला ते मान्य नसून दिसत असलेल्या परिस्थितीकडे लक्ष न देण्याची सरकारची प्रवृत्ती घातक आहे. हिटलरदेखील निवडणुका जिंकत होता कारण त्याने सर्व संस्थांवर ताबा मिळवला होता. तुम्ही माझ्या हातात सगळ्या संस्था द्या मग मी तुम्हाला निवडणूक कसे जिंकतात ते दाखवून देतो असे देखील आव्हान राहुल गांधी यांनी मोदी यांना दिले आहे.


शेअर करा