चारशे पार संविधान बदलण्यासाठीच हवं , भाजपच्या कोणत्या दिग्गज नेत्यांनी म्हटलंय घ्या जाणून

शेअर करा

संविधान बदलणार नाही असे भाजपचे नेते कितीही बेंबीच्या देठापासून ओरडत असले तरी गेल्या काही दिवसात भाजप नेत्यांची वक्तव्ये पाहता त्यांच्यावर आता जनतेचा विश्वास दिसून येत नाही. मागील काही दिवसातच तब्बल चार भाजपच्या नेत्यांनी संविधान बदलण्यासंदर्भात वक्तव्य केलेली आहेत. अबकी बार ४०० पारचा नारा दिल्यानंतर भाजप नेत्यांनी या संदर्भात वक्तव्ये केली आणि काँग्रेसने 400 पार यांना संविधान बदलण्यासाठी हवे आहे असा आरोप केला त्यानंतर भाजप नेत्यांना पळता भुई थोडी झालेली आहे.  संविधान बदलणे हा शब्दच मुळात नागरिकांच्या हक्कांवर मर्यादा आणणारा असल्याने भाजपवर विश्वास ठेवण्याजोगी परिस्थिती एससी एसटी आणि ओबीसी समाजबांधवांची राहिलेली नाही. प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधताना मोदी यांना जे काही करायचे आहे ते आधी खालच्या फळीतील लोकांकडून बोलवून त्यानंतर अमलात आणले जाते अशी भाजपची नीती असल्याचे सांगितले होते . 

भाजप नेते अनंत हेगडे यांनी मार्च २०२४ मध्ये ‘ चारशे पार याच्यासाठी पाहिजे कारण आम्ही संविधान बदलू शकू  ‘ असे म्हटलेले होते. दोन एप्रिल 2024 रोजी ज्योती मिर्धा ज्या सध्या भाजपच्या तिकिटावर राजस्थानमधून निवडणूक लढवत आहेत त्यांनी देखील प्रचारादरम्यान ‘ चारशे पार याच्यासाठी पाहिजे की संविधान बदलणे शक्य होईल ‘ असे म्हटले होते.  उत्तर प्रदेशातील मेरठ इथून भाजपच्या तिकिटावर उभे असलेले रामायणातील रामाची भूमिका करणारे अरुण गोविल यांना देखील या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यावेळी त्यांनी ‘ संविधान बदलायचे असेल तर त्यात चूक काय आहे’ असा प्रतिप्रश्न केलेला होता आणि फैजाबाद भाजपचे खासदार लल्लू सिंग यांनी एका बैठकीत ‘ चारशे पार याच्यासाठी पाहिजे कारण संविधान बदलले जाऊ शकेल ‘  असे म्हटलेले होते.  भाजप नेत्यांची ही वक्तव्य सध्या पक्षासाठी प्रचंड अडचणीची ठरलेली आहेत. 

‘ अबकी बार चारसो पार ‘ हा नारा भाजपने त्यानंतर गुंडाळलेला दिसत असून पहिल्या दोन टप्प्यात कमी मतदान झाल्याने भाजपच्या पायाखालील वाळू सरकली असल्याने त्यामुळे धार्मिक ध्रुवीकरण हा एकच पर्याय सध्या भाजपला दिसतो आहे .काँग्रेसच्या न्यायपत्रामध्ये समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याची गोष्ट आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळसूत्र वगैरे असे विषय जे काही घेतले ते जनतेला फारसे रुचलेले नाहीत.देशभरातील एससी एसटी आणि ओबीसी यांना भाजप सत्तेत येण्याचीच भीती वाटू लागली तर लोकांपर्यंत पोहचण्याची उरलेली कसर काँग्रेसच्या सभांमध्ये राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी भरून काढली. 

पंतप्रधान मोदी यांच्या गॅरंटीची खिल्ली त्यांच्या वैवाहिक जीवनाशी जोडून देखील विरोधक उडवत आहेत. नवीन संसदेचे उद्घाटन असो वा राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हिंदू धर्माच्या रीतीने अशा गोष्टी सपत्नीक करणे गरजेचे आहे मात्र तिथेही पंतप्रधान मोदी यांनी एकट्यानेच हे सोहळे पार पडले ही बाब देखील जनतेला रुचलेली नाही. विरोधकांच्या बोलण्यात मोदी यांच्या वैवाहिक जीवनावर टीका दिसत असली तरी त्या टीकेला प्रत्युत्तर द्यायचे कसे कारण उत्तरच नाही त्यामुळे नेहमीप्रमाणे हिंदू मुस्लिम , पाकिस्तान , चीन , काँग्रेस , पंडित नेहरू , गांधी कुटुंबीय यांच्या पलीकडे भाजप सरकत नाही. भ्रष्टाचारावर आपण आक्रमक असल्याचा मोदी भाषणात आव आणतात मात्र त्यांच्याच स्टेजवर वेगवेगळ्या पक्षातील भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आयात नेते दिसून येतात. 

स्थानिक विषय देखील तितकेच महत्त्वाचे आहेत मात्र स्थानिक विषयांना हात घालणे भाजपला अडचणीचे ठरत असल्याकारणाने राष्ट्रीय मुद्दे पुढे करून मताचा जोगवा मतदारांपुढे मागितला जात आहे . धार्मिक मुद्द्यांवरच भाजप आणि गोदी मीडिया सध्या लोळत पडलेली असून महागाई , बेरोजगारी, महिला सुरक्षा , चीनचे अतिक्रमण, महागडे होत चाललेले शिक्षण असे अनेक मुद्दे सध्या महत्त्वाचे आहेत. सर्वसामान्य नागरिक महागाईमुळे मेटाकुटीला आलेला असताना त्याला धार्मिक उपदेशाचे डोस आणि विद्वेषपूर्ण सल्ले आता नागरिकांच्या पचनी पडायला तयार नाहीत. 

अडचणीच्या ठिकाणी जायचेच नाही ( मणिपूर ) , आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्याच्या माथ्यावर फोडायचे (काँग्रेस)  , यश मिळाले तर त्याचे क्रेडिट घेण्यासाठी सर्वप्रथम जायचे (चांद्रयान , अयोध्या मंदिर ) आणि गोदी मीडियाने त्याची टिमकी देशभरात वाजवायची अशा पद्धतीने गेली दहा वर्ष भाजपने सत्ता उपभोगलेली आहे. कोणी विरोध केला तर त्या व्यक्तीसोबत त्याच्या कुटुंबीयांवर देखील अत्यंत खालच्या पातळीवर टीका करायची त्याचे इतर कुठल्याही धर्मासोबत काहीतरी कनेक्शन शोधायचे आणि त्याचाच आधार घेत त्याचे खच्चीकरण करायचे याला आता जनता भीकच घालत नाही हे भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी समजून घेण्याची गरज आहे मात्र सध्या विश्वगुरूच्या अहंकारात असलेल्या भाजपला खुर्ची गेल्याशिवाय जमिनीवरील परिस्थिती समजणार नाही.


शेअर करा