वृद्ध महिलेचा मृतदेह खुर्चीला बांधलेल्या अस्वस्थेत आढळला

शेअर करा

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शहरात समोर आलेली असून शहरातील निराला बाजार परिसरात उच्चभ्रू वसाहत असलेल्या शारदाश्रम कॉलनीमध्ये एका 70 वर्षीय वृद्ध महिलेची अत्यंत अमानुषपणे हत्या करण्यात आलेली आहे. राहत्या घरातच खुर्चीवर कपड्याने बांधलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळलेला असून रात्री बाराच्या सुमारास ही घटना समोर आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , अलका तळणीकर असे मयत महिलेचे नाव असून बुधवारी रात्री त्यांची अज्ञात व्यक्तींनी हत्या केली. 70 वर्षीय तळणीकर या त्यांच्या राहत्या घरी एकट्याच राहत होत्या. त्यांचा बहिणीचा मुलगा मुंबईला गेलेला होता आणि त्यांचा एक मुलगा लातूर येथे राहतो तर भाऊ विदेशात राहतो त्यामुळे तळणीकर ह्या बंगल्यामध्ये एकट्याच राहत होत्या.

अलका तळणीकर यांच्या पहिल्या मजल्यावरील सर्व गाळे व्यावसायिक भाडेतत्त्वावर दिलेले आहेत. मुंबईला गेलेल्या बहिणीच्या मुलाने अलका यांना फोन केला मात्र प्रतिसाद येत नसल्याने त्यांनी भाडेकरूंना फोन केला आणि त्यानंतर हा प्रकार समोर आला. इमारतीमधील अभ्यासिकेतील विद्यार्थी आणि भाडेकरूंनी जाऊन पाहिले त्यावेळी अलका यांना खुर्चीवर बांधलेले होते त्यांचे पाय आणि तोंड चिकटपट्टीने बांधलेले होते आणि शरीर मागे खुर्चीला कपड्याने बांधलेले होते.

पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली आणि तात्काळ पोलीस उपयुक्त नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे, क्रांती चौक ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. चार ते पाच संशयतांना याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले असून क्रांती चौक पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.


शेअर करा