अखेर ‘ ती ‘ एक दिवसाची नवरी पोलिसांच्या ताब्यात : काय आहे प्रकरण ?

शेअर करा

लग्नानंतर काही तासांमध्येच नवरदेवाच्या घरातून दागिन्यांसह फरार झालेल्या त्या एक दिवसाच्या नवरीला पैठण पोलिसांनी परभणी येथून अटक केली आहे. लग्न जमत नसलेल्या अनेक कुटुंबांना हेरून या टोळीने खोटे नाव व पत्ता सांगत लग्ने उरकली असल्याचे समोर येत असून पोलिसांनी नवरीसह पैठण तालुक्यातील एजंट याला तसेच एका महिलेला देखील अटक केली आहे. या प्रकरणातील नवरीची तोतया म्हणून उभी केलेली बहीण आणि मेहुणा हे मात्र फरार आहेत. bride who escaped from Paithan after getting married was caught in parbhani

पैठणच्या लक्ष्मीनगर भागातील मोलमजुरी करणाऱ्या सुनंदा कारभारी वनसारे यांचा मुलगा कृष्णा याचे लग्न जमत नसल्याने पैठण तालुक्यातील तेलवाडी येथील एजंट नूर मोहम्मद शेख याच्यामार्फत 50000 रुपये मुलीला देऊन 17 ऑक्टोबर रोजी मुलाच्या घरी त्यांचे लग्न लावण्यात आले होते. मात्र त्याच दिवशी रात्री नववधू दागिन्यांसह फरार झाल्याने कृष्णा यांनी पत्नी फरार झाल्याची तक्रार 18 ऑक्टोबरला पैठण पोलिसात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि ही नवरी परभणीत असल्याची माहिती मिळाली. तपासी अधिकारी आणि महिला पोलिसांनी सदर महिलेला परभणीतून अटक केली आणि पैठण येथील पोलीस ठाण्यात आणले.

लग्नाच्या वेळी नवरीचे नाव उषा पवार आणि पत्ता जालना येथील दाखवण्यात आला होता मात्र नवरीचे खरे नाव मनीषा सचिन आठवे असून दर्गा रोड परभणी इथे राहते लग्नासाठी आणलेली नवरी ची बहिण पूजा पवार व मेहुना राजू पवार हे बर्गी मोहल्ला मानवत येथील रहिवासी असून त्यांचे खरे नाव पूजा कचरूलाल निलपत्रेवार व मेव्हण्याचे नाव कचरूलाल निलपत्रेवार असे आहे. ते दोघेही खरे नवरा-बायको आहेत.

परभणीतून अटक केलेल्या मनीषा उर्फ उषा पवार हिचे पहिले लग्न मुंबईतील तरुणासोबत झाले होते मात्र गेल्या काही वर्षांपासून ती नवऱ्याला सोडून परभणीत आपल्या आईकडे राहते. दरम्यान पूजा पवार व कचरूलाल यांच्याशी ओळख झाल्यानंतर त्यांनी संगनमताने लग्न जमत नसलेल्या अनेक तरुणांना गंडवले आहे. याच पद्धतीने त्यांनी गंगाखेड व जालना येथे अनेक जनांची फसवणूक केल्याची समोर आले आहे

काय आहे प्रकरण ?

लग्नाच्या पहिल्या दिवशी नववधू दागिने घेऊन फरार झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे घडली होती. लग्न जमण्यास सातत्याने अडथळे येत होते म्हणून मुलाच्या आईने एका दलालाला मध्यस्थ घालून दलालामार्फत लग्न जुळवले. त्या मुलीला हुंडा देखील देण्यात आला मात्र लग्नाच्या पहिल्या रात्री हळदीच्या अंगासह नववधू दागिने घेऊन फरार झाली. विशेष म्हणजे फरार झालेल्या नववधूला फोन केला असता तिने मुलाच्या आईला दमदाटी देखील केली होती.

उपलब्ध माहितीनुसार, पतीचे नाव कृष्णा वनसारे असे असून फरार झालेल्या नववधूचे नाव उषा पवार असे तिने सांगितले होते. पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार मोलमजुरी करून कृष्णा कारभारी वनसारे आईसोबत पैठणमध्ये लक्ष्मीनगर भागात राहतो. कृष्णाच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. कृष्णाची आई उपवर मुलीच्या शोधात होती मात्र योग्य स्थळ मिळत नसल्याने त्यांनी दलाल नूर मोहम्मद मेहरण शेख यांची मदत घेतली आणि सोळा तारखेला पैठण येथे नाथ मंदिर परिसरात मुलगी बघण्याचा कार्यक्रम करण्यात आला.

आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने 17 तारखेला जास्त गाजावाजा न करता मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत दुपारी तीन वाजता कृष्णाच्या घरात लग्न लावण्यात आले. पैठण तालुक्यातील तेलवाडी येथील नूर मोहम्मद शेख याने मुलगी दाखवण्यासाठी पाच हजार रुपये घेतले. कृष्णाच्या आईकडे वधूची बहीण व मेहुण्याने मुलीसाठी चक्क दोन लाख रुपये मागितले होते मात्र इतके पैसे नसल्याने शेवटी 50 हजार रुपये हुंडा देऊन लग्नास होकार देण्यात आला आणि 17 तारखेला लग्न लावण्यात आले. ज्या दिवशी लग्न लावले त्याच दिवशी रात्री तीन ते पाचच्या दरम्यान घरातील सदस्य झोपेत असताना नववधू फरार झाली.


शेअर करा