न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा काहींचा प्रयत्न , सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांना पत्र 

शेअर करा

‘ सर्वसामान्य नागरिकाच्या आशेचा शेवटचा किरण असलेली न्यायव्यवस्था हीच सध्या कमकुवत करण्याचा काही व्यक्तींचा प्रयत्न आहे ‘ असा आरोप करत 21 माजी न्यायाधीश यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र लिहिलेले आहे. विशेष बाब म्हणजे पत्र लिहिणाऱ्या व्यक्तींमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या चार तर उच्च न्यायालयाच्या 17 माजी न्यायाधीशांचा समावेश आहे. 

सद्य परिस्थितीत संकुचित राजकीय हित आणि वैयक्तिक लाभांसाठी न्यायव्यवस्थेलाच कमकुवत केले जात आहे त्यामुळे लोकांमधील न्यायव्यवस्थेचा विश्वास कमी करण्याचा देखील प्रयत्न होत आहे. काही गटांकडून न्यायव्यवस्थेवर दबाव टाकण्यात येतो आणि खोटी माहिती पसरवत न्यायव्यवस्थेचा सार्वजनिकरित्या अपमान केला जातो. न्यायाधीश आणि न्यायालयांच्या प्रामाणिकपणावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते , असा गंभीर आरोप या पत्रात करण्यात आलेला आहे. 

‘ अनावश्यक दबावापासून न्यायव्यवस्थेला वाचवण्याची गरज ‘ असे या पत्राचे टायटल असून त्यामध्ये न्याय आणि नि:पक्षतेच्या सिद्धांताला आव्हान दिले जात आहे अशा परिस्थितीत न्यायालयीन पावित्र्य आणि स्वातंत्र्य सुरक्षित राखण्याच्या उद्देशाने आवश्यक प्रयत्नांची गरज असल्याचे म्हटलेले आहे. 


शेअर करा