नेटिझन्सचे आभार मानत अमृता फडवणीस म्हणाल्या ‘ मी पुन्हा येईन मात्र … ‘

  • by

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवे गाणे भाऊबीजेच्या मुहूर्ताला टी सीरिजने रिलीज केल्यामुळे काही तासांतच ते व्हायरल झाले. अमृतांनी हे गाणे नारी शक्तीला समर्पित केले आहे. हे गाणे शेअर करताना त्यांनी स्वत:चा आणि मुलीचा फोटो वापरला आहे. अमृतांच्या या गाण्याला दोनच दिवसांत 10 लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत मात्र लाईक्सच्या तुलनेत डिसलाईकचे प्रमाण १० पट आहे तर कमेंट्स देखील त्यांना ‘ गाऊ नका ‘ असा सल्ला देणाऱ्या असल्याने अमृता यांनी ट्विट करुन चाहत्यांचे आणि टीकाकारांचेही आभार मानले.

नारीशक्तीच्या सन्मानार्थ या गाण्याचे बोल आहेत मात्र गाण्याची भट्टी जमली नाही असेच बहुतांश नेटिझन्सचे मत आहे . इंटरनेटवर हे गाणं व्हायरल झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी सर्वांचे आभार मानले. ”तिला जगू द्या… या गाण्याचं आपण कौतुक केलंत, त्यामुळेच गेल्या 2 दिवसांत तब्बल 10 लाख व्ह्यूवज तिला मिळाले असून आपण गाण्याला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपणा सर्वांचे आभार, असे अमृता फडणवीस यांनी म्हटलंय. तसेच, माझं कौतुक करणाऱ्या आणि माझ्यावर टीका करणाऱ्या सर्वांचं मी आभार मानते. लवकरच, मी नवीन काहीतरी घेऊन आपल्या भेटीला येईल,” असेही अमृता यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय. तब्बल १० पट डिसलाईक बद्दल मात्र त्यांनी पद्धतशीर मौन बाळगले आहे तर दुसरीकडे अमृता फडवणीस यांच्या युट्युब चॅनेलवर हे गाणे असून दोन दिवसात फक्त १३४१ व्ह्यूज आले आहेत तर १४ लाईक आणि ४८४ डिसलाईक्स आहेत.

अनेकांनी या गाण्यावरुन अमृता फडणवीस यांना ट्रोलही केले. तसेच, भाजपाविरोधी पक्षातील समर्थकांनीही या गाण्यावरुन टीका केली. मात्र, अमृता यांनी टीकाकारांचे आणि कौतुक करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. चाहत्यांना हे गाणे आवडले असेलही पण मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता महेश टिळेकर यांनी मात्र अमृतांच्या या गाण्यावर सडकून टीका केली आहे. ‘हिला नको गाऊ द्या,’ असे लिहित त्यांनी अमृतांच्या या गाण्यावर भलीमोठी पोस्ट शेअर केली.

काय आहे महेश टिळेकर यांची पोस्ट ?

हिला नको गाऊ द्या.. चांगला आवाज असूनही केवळ नाव नाही हाती भरपूर पैसा नाही म्हणून नवीन गायकांना कुणी मदतीचा हात देऊन संधी देणारा पाठीशी उभा राहत नाही. सुमधुर आवाज असलेल्या महाराष्ट्रातील अनेक नवीन गायकांना साधी कुठं संधी मिळत नाही पण जिचा आवाज ऐकला की कानाचे पडदे फाटण्याची भीती निर्माण होते ,लाखो तरुणांच्या ह्रदयात धडकी भरते आणि गाणं हे दुसऱ्याला आनंद देण्याऐवजी दुःख देण्यासाठीच गायले जाते असा समजच होण्याची शक्यता निर्माण होते अशी एक आपल्याच विश्वात धुंद होऊन गाणारी विश्र्वगायिका लोकांना सातत्याने का छळत आहे?

गायी म्हशीच्या हंबरडण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण या गायिकेचा आवाज ऐकून तिच्या आवाजाला अनेकांनी शब्दरुपी श्रद्धांजली वाहिली तरीही ही स्वयंघोषित गायिका मी पुन्हा गाईन मी पुन्हा गाईन म्हणत आपल्या गळ्याचा व्यायाम थांबवायचे नाव घेत नाही. आपल्याकडे जुनी म्हण आहे ” आडात नसेल तर पोहऱ्यात येणार कुठून? केवळ ह्या अश्या गायिकेला प्रोमोट करण्यासाठी तिला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्यासाठी टी सिरीज सारखी ,नेहमीच बिझिनेसला प्राधान्य देणारी कंपनी का पैसा खर्च करत आहे,? त्यामागे काय लागेबांधे आहेत ? हे एक न सुटणारे कोडे आणि जर ह्या गायिके कडे स्वतःचा अतिरिक्त खूपच पैसा असेल तर तिने एखादं संगीत विद्यालय सुरू करून नवोदित गायकांना चांगल्या संगीत शिक्षकांचे मार्गदर्शन होईल यासाठी स्वतः न गाता फक्त संगीत सेवा करावी.

पण काहीही म्हणा लता मंगेशकर यांनी गायलेल्या ” आज अमृताचा दीनु..या ओळीतील अमृता हा शब्द लता दीदींच्या मुखातून ऐकायला आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवितून वाचायलाच योग्य वाटतो.इतरांनी फक्त त्या अमृता नावाची किमान लाज राहील याचा तरी प्रयत्न करावा : महेश टिळेकर