नगर हादरले .. राष्ट्रवादीच्या कार्यकर्तीची जातेगाव घाटात वार करून हत्या

शेअर करा

नगर जिल्हा हादरवून टाकणारी घटना काल (दि. ३० ) रोजी रात्री घडली आहे. यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांचा जातेगाव घाटात खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात त्यांच्यावर हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार केले होते. त्यानंतर तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले मात्र त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला.

उपलब्ध माहितीनुसार, रेखा जरे या पुण्यावरून अहमदनगरला येत असताना जतेगावच्या घाटात असतानाच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या रेखा यांना काही वेळातच नगर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. घटनेत घातपाताचा देखील संशय व्यक्त केला जात आहे.

गाडीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून रेखा जरे यांची आरोपीसोबत बाचाबाची झाली आणि त्यानंतरच जरे यांच्यावर हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे. या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाला. जरे यांच्यासोबत त्याच्या आई आणि लहान मुलगा होता. गाडीचा मिरर लागल्याच्या शुल्लक कारणावरून हुज्जत घालण्यास सुरुवात झाली असल्याचे बोलले जात आहे .

जरे यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांच्यासह कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती .मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान या घटनेमुळे नगर जिल्हा हादरून गेला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.


शेअर करा