भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा भिसे यांचा प्रसुती नंतर मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या यंत्रणेवर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने चौकशीचे आदेश दिलेले असले तरी जनआक्रोश थांबण्याची चिन्हे दिसून येत नाहीत. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं यावेळी रुग्णालय अधिकाऱ्यांच्या अंगावर नाणी टाकत ‘चिल्लरफेक’ करण्यात आली.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पैशांचा इतका हव्यास आहे, म्हणून आम्ही भीक मागून पैसे आणले आहेत, ते आम्ही त्यांना देत आहोत, अशा शब्दात शिवसेनेच्या महिला कार्यकर्तीने संताप व्यक्त केला असून चॅरिटेबल ट्रस्ट असूनही पैशांसाठी आडमुठेपणा करत रुग्णाच्या जिवाशी खेळ केल्याचा आरोप केला जात आहे. काही आंदोलकांनी हॉस्पिटलबाहेर असलेल्या ‘दीनानाथ मंगेशकर रुग्णालय’ या बोर्डवरही काळं फासलं. रुग्णालयाच्या बेफिकिरीवर मंगेशकर कुटुंबाने उत्तर द्यावं, अशी मागणी होत आहे.
गोरगरीब आणि सर्वसामान्य रुग्णांसाठी हे हॉस्पिटल आहे, असं त्यावेळी स्वर्गीय लता मंगेशकर म्हणाल्या होत्या मग पैशासाठी एका निष्पाप महिलेचा बळी का घेतला ? . दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मान्यता रद्द करण्यात यावी आणि प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. संबंधित रुग्णालयासाठी अत्यल्प दरात दीनानाथ मंगेशकर ट्रस्टला जमीन देण्यात आली मग धर्मादाय रुग्णालय असूनही १०-१० लाखांचे डिपॉझिट का मागितले जाते, असा सवालही संतप्त आंदोलकांनी केला आहे.