बाळ बोठे याच्या अडचणी वाढल्या, कोर्टाकडून ‘ महत्वाचा ‘ निर्णय आला

  • by

नगर येथील रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला फरार घोषित करण्याच्या मागणीचा अर्ज पारनेर न्यायालयाने मंजूर केला आहे. त्याला पोलिसांसमोर हजर होण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली असून त्यानंतर संपत्ती जप्तीची कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती तपास अधिकारी पोलीस अधीक्षक अजित पाटील यांनी दिली. बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने यापूर्वीच फेटाळला आहे.

रेखा जरे यांच्या खुनाला तीन महिने होऊन गेले. तरीही बोठेचा ठावठिकाणा पोलिसांना लागत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याला फरार घोषित करण्याच्या मागणीसाठी चार दिवसांपूर्वी पारनेरच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी झाली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी उमा बोऱ्हाडे यांनी गुरूवारी हा अर्ज मंजूर केला. त्यामुळे आता आरोपी बोठे याला कायदेशीररित्या फरार घोषित करण्यात आले आहे.

आता पोलीस पुढील कारवाई सुरू करणार असून या आदेशानुसार आरोपीला हजर होण्यासाठी एक महिन्याची मुदत असते. या काळात पोलिसांकडून आरोपीची छायात्रित्रे सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध करून हजर होण्याचे आणि लोकांना त्याला पकडून देण्याचे आवाहन करू शकतात. याही माध्यमातून आरोपी हजर झाला नाही, तर कायद्यातील तरतुदीनुसार त्याची संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरू केली जाते. त्यासाठी पुन्हा न्यायालयात अर्ज करून परवानगी घेतली जाते. आरोपीच्या नावावर असलेली संपत्ती जप्त करणे, बँक खाती सील करणे अशी कारवाई करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा होईल.

दरम्यान रेखा जरे यांच्या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्यासाठी कोण लपवाछपवी करत आहे? पोलिसांची गुप्तचर यंत्रणाही का काम करू शकत नाही? सरकार त्याला पाठीशी घालतेय काय? असे प्रश्न उपस्थित करीत जरे यांचा मुलगा रुणाल यांनी पाच मार्चपासून पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे, जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी याप्रकरणी एक निवेदन दिलेले आहे. रेखा जरे यांचे प्रकरण दडपण्यासाठी मोठे कारस्थान सुरू असल्याचा संशयही जरे यांनी व्यक्त केला असून एकप्रकारे हे यंत्रणेला दिलेले आव्हान असल्याची देखील त्यांनी टीका केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?

रेखा जरे या पुण्यावरून अहमदनगरला येत असताना जातेगावच्या घाटात असतानाच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या रेखा यांना काही वेळातच नगर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. घटनेत घातपाताचा देखील संशय सुरुवातीपासूनच व्यक्त केला जात होता तसेच घडलेले कारण हे तात्कालिक नसावे तर हा पुर्ननियोजीत कट असण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत होती आणि अखेर ती खरी ठरली.

गाडीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून रेखा जरे यांची आरोपीसोबत बाचाबाची झाली आणि त्यानंतरच जरे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाला. जरे यांच्यासोबत त्याच्या आई आणि लहान मुलगा होता. गाडीचा मिरर लागल्याच्या शुल्लक कारणावरून हुज्जत घालण्यास सुरुवात झाली होती.

रेखा जरे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. विशेष म्हणजे जरे यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी बोठे देखील हजर होता तेव्हापासूनच पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता. दरम्यान याच गुन्ह्यातील इतर आरोपीना अटक होताच बोठे फरार झाला आणि अद्यापदेखील पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दरम्यान या घटनेमुळे नगर जिल्हा हादरून गेला असून लवकरात लवकर बोठे यास अटक करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.