पुण्यातील प्रसिद्ध ‘चितळे बंधू मिठाई’ यांच्याकडे मागितली तब्बल २० लाखांची खंडणी, काय आहे प्रकरण ?

  • by

 13 total views

तुमच्या दुधामध्ये काळ्या रंगाच्या सदृश्य पदार्थ आढळून आला आहे. तुमच्याविरूद्ध अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांकडे तक्रार करतो. हे प्रकरण लवकरात लवकर मिटवा, अन्यथा तुमचे दुकान बंद करू. चालू देणार नाही. तुमची बदनामी करू, कोणालाही जिवंत सोडणार नाही अशा धमक्या देत पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक चितळे बंधू मिठाईवाले यांच्याकडे 20 लाख रूपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चितळे व्यावसायिकांनी दिलेल्या बनावट नोटा असलेली दोन हजार रूपयांची दहा बंडल स्वीकारताना आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले असून याप्रकरणी एका शिक्षिकेसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

पूनम सुनील परदेशी ( वय 27 रा. 101 घोरपडी गाव), सुनील बेनी परदेशी (वय 49), करण सुनील परदेशी (वय 22) व अक्षय मनोज कार्तिक अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नामदेव बाबुराव पवार (वय 63 सहाय्यक मार्केटिंग व्यवस्थापक, मेसर्स बी.जी चितळे डेअरी रा. पारस रिव्हेरा शिवाजी चौक, पिंपळे सौदागर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्यावर बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूनम परदेशी एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका असून, सुनील परदेशी आणि करण परदेशी यांचा लॉंड्रीचा व्यवसाय आहे. पूनम परदेशी यांनी प्रसिद्ध व्यावसायिकाच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्राकडे दूधाबाबत इ-मेलद्वारे तक्रार केली. त्यानंतर प्रत्यक्ष आणि दूरध्वनीद्वारे दुधामध्ये काळ्या रंगाच्या सदृश्य पदार्थ आढळून आला आहे असे सांगून त्यांना वारंवार धमकी देण्यात आली. त्यांच्या धमक्यामुळे कंपनीने भीतीपोटी दोन हजाराच्या बनावट नोटा असलेले एकूण दहा बंडल असे वीस लाख रूपये आरोपींना दिले. ही रक्कम स्वीकारताना तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले. तर त्यांचा साथीदार अक्षय मनोज कार्तिक याला भारत फोर्ज मुंढवा समोरून ताब्यात घेण्यात आले.

अक्षय कार्तिक याच्याविरूद्ध यापूर्वी वानवडी व मुंढवा पोलीस स्टेशन येथे सरकारी कामात अडथळा आणणे, दंगा मारामारीचे तीन गुन्हे तर सुनील परदेशी यांच्याविरूद्ध मुंढवा पोलीस स्टेशन येथे मारामारीचे दोन गुन्हे व करण परदेशी विरूद्ध मारामारीचा एक गुन्हा दाखल आहे. ही कामगिरी युनिट 1 चे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव आणि त्यांच्या पथकाने केली आहे.