नगर शहर तसेच जिल्ह्यातही कोरोना आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नाहीत अशा पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे यांनी नगर जिल्ह्यात व शहरात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्याची मागणी केली आहे . सुजय विखे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना याबद्दल पत्र लिहले आहे .
काय आहे सुजय विखे यांनी लिहलेल्या पत्रातील मजकूर ?
नगरमधील रुग्णवाढीचा वेग अंगावर शहारे आणणारा आहे. जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, त्यांच्यापर्यंत प्रशासकीय यंत्रणा पोहोचत नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली आहे. शहरामध्ये पाच दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करण्याची गरज आहे. दुसरा पर्याय नाही .
नगर शहर व जिल्ह्यात करोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत आहे. या महामारीच्या विरोधात लढण्यासाठी आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन, अहोरात्र राबत आहे. मात्र करोना बाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर करोना संशयितांची टेस्टिंग आणि ट्रेकिंग या दोन खात्रीशीर उपाययोजना आपल्या पुढे आहेत.
एकीकडे करोना रुग्णांची वाढती संख्या आणि सध्या असलेल्या सुविधांवर पडणारा ताण या कोंडीत आपण सर्व जण सापडलो आहोत. एक महिन्यापूर्वी नगरमध्ये करोना प्रसाराचा वेग प्रतिदिवस एक रुग्ण असा होता. तो आता दिवसाला दोनशे रुग्ण असा झाला आहे. रुग्ण वाढीचा हा वेग अंगावर शहारे आणणारा आहे. त्याच वेळी जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, त्यांच्यापर्यंत प्रशासकीय यंत्रणा पोहोचत नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली आहे.
वाढती रुग्णसंख्या, पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांपर्यंत पोहोचण्यात येत असलेले अपयश, या सगळ्यांचा परिपाक साथीच्या आजाराच्या स्फोटात होण्याची दाट शक्यता आहे. एक खासदार म्हणून नव्हे तर एक डॉक्टर म्हणून या सर्व गोष्टीकडे बघत असताना करोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी जनता कर्फ्यू लागू करणे हाच पर्याय मला सध्या दिसतो आहे. त्यामुळं नगर शहरात व ज्या तालुक्यांमध्ये जिथं रुग्ण वाढीचा आकडा तीन अंकी आहे, अशा ठिकाणी पाच दिवसाचा जनता कर्फ्यू घोषित करण्यात यावा ” ( पत्र समाप्त )
दरम्यान , नगर जिल्ह्यात आता पुन्हा करोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. बाधितांचा आकडा हा आता दोन हजारांच्या पुढे गेल्यानंतर शहर व परिसरात पुन्हा लॉकडाऊन सुरु करण्याची मागणी जोर धरते आहे, मात्र लॉकडाऊन करून देखील शासनाकडून तपासण्यांची संख्या वाढणार नसेल तर घरात तुरुंग बनवून प्रशासन तरी नेमके काय साधणार ? असा देखील एक मतप्रवाह आहे .