तलाठी भाऊसाहेबासाठी लावला ‘ सापळा ‘ ,  हाती दुसराच आला पण..

शेअर करा

महाराष्ट्रात लाचखोरीचा एक अद्भुत प्रकार छत्रपती संभाजीनगर येथील बिडकीन इथे समोर आलेला असून नदीत पकडलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच घेताना एका तलाठ्यासोबत एका व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेले आहे . बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास पैठण तालुक्यातील शेकटा चौफुली येथे ही कारवाई करण्यात आलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , तलाठी म्हणून काम करणारे लोकसेवक सुरजसिंग त्रिंबकसिंग राजपूत याला नदीत ट्रॅक्टर आढळलेले होते . ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी राजपूत याने खाजगी व्यक्ती संभाजीराव नंदू शिंदे यांच्यामार्फत दहा हजार रुपये लाचेची मागणी केली मात्र तडजोडीत आठ हजार रुपयांची रक्कम ठरलेली होती. 

फिर्यादी व्यक्ती यांना लाच द्यायची इच्छा नसल्याकारणाने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दाखल केली आणि त्यानंतर सापळा लावण्यात आला . बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास खाजगी व्यक्ती असलेला संभाजीराव शिंदे यांच्यामार्फत लाच घेताना राजपूत याला रंगेहात पकडण्यात आलेले आहे . बिडकीन पोलीस ठाण्यात सुरज सिंग त्रिंबक सिंग राजपूत ( राहणार विना सोसायटी जटवाडा रोड छत्रपती संभाजीनगर ) व संभाजीराव नंदू शिंदे ( राहणार बिडकीन ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 


शेअर करा