‘ आता तुम्ही अमर होणार आहात ‘, मांत्रिकाची काळी जादू की अघोरी खून ? : पोलिसांचा कसून तपास सुरु

  • by

‘ आता तुम्ही अमर होणार आहात ‘ , असे त्यांना एका मांत्रिकाने सांगितले होते मात्र त्याच्या नादी लागून चक्क जीव गमवावा लागल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात चांदा गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरत्त्व मिळवण्यासाठी केलेल्या अघोरी विद्येच्या प्रयत्नात तीन तरुणांचा जीव गेल्याची घटना घडली आहे. शहापूर तालुक्यातील खर्डी जवळील चांदा गावातील मामाभाचे व शहापूर येथील एका विवाहित तरुणाचा मृतांमध्ये समावेश आहे.

उपलब्ध माहितीनुसार , 14 नोव्हेंबरला म्हणजेच लक्ष्मीपूजनच्या अमावस्येला रात्री 11 च्या सुमारास नितीन भेरे (वय-35, रा. शहापूर), महेंद्र दुभेले (वय-30, रा.चांदा, खर्डी) व मुकेश घावट (वय-22, रा.चांदा, खर्डी) हे तिघे बेपत्ता झाले होते. त्यानंतर शोधा शोध सुरु असताना या तिघांचे मृतदेह जंगलातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेले आढळून आले. तिघांनी गावापासून जवळच्या जंगलात जाऊन एका झाडाला साडीने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

तिघांचे मृतदेह ज्या पद्धतीने आढळले आहेत त्यावरून या तिघांबाबत परिसरात वेगळीच चर्चा होती. त्यानुसार एक तर लक्ष्मीपूजन अमावस्येच्या रात्री मुक्ती मिळवण्यास म्हणजेच अमरत्व मिळवण्यास तिघांनी लटकून घेतलं असावं अशी एक चर्चा आहे तर दुसरी चर्चा म्हणजे अमरत्व मिळवण्याचे लालूच दाखवून त्यांचे शोषण केले आणि तसे न झाल्याने या तिघांची कोणीतरी हत्या केली असावी, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे हत्या की आत्महत्या या दोन्ही बाबी समोर ठेवून शहापूर पोलिस तपास करत आहेत.