लाचखोर महिला वाहतूक पोलिसाचा ‘ असाही ‘ कारनामा कॅमेऱ्यात कैद : पहा व्हिडीओ

शेअर करा

एका महिला वाहतूक पोलीस कर्मचारी महिलेने कारवाई टाळण्यासाठी लाच घेण्याची नवी टूम शोधली आहे. ती टूम एका कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एक तरुणी चक्क या महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या खिशात पैसे ठेवतानाचा व्हिडीओ सध्या शहरात व्हायरल होत आहे. बातमी पुणे येथील असून सदर वाहतुक पोलीस कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून वाहतूक पोलीस कसे चिरीमिरी घेऊन प्रकरण मिटवून घेतात याचीच शहरात चर्चा आहे .

पिंपरीच्या शगुन चौकातील हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळाली आहे. या वाहतूक पोलीस कर्मचारी महिलेनं कारवाई टाळण्यासाठी एका तरुणीकडून लाच स्वीकारली. एवढेच नव्हे तर लाचेचे पैसे पॅन्टच्या पाठीमागच्या खिशात ठेवण्यास तरुणीला सांगितले. दरम्यान, हा सर्व प्रकार रस्त्याकडेला असलेल्या इमारतीमधील मुलांनी मोबाईलमध्ये चित्रीत केला आणि शेअर केला. सध्या हा व्हिडिओ शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

पिंपरी वाहतूक पोलीस विभाग येथे कार्यरत असलेली एक महिला वाहतूक पोलीस शगुन चौकात अन्य सहकाऱ्यांसोबत कर्तव्य बजावत होती. दरम्यान, तिथे एका मोपेड दुचाकीवरून दोन तरुणी आल्या. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे संबंधित महिला वाहतूक पोलिसाने त्यांना सांगितले. ही कारवाई टाळण्यासाठी काही रक्कम घेण्याची तडजोड झाली आणि त्या वाहतूक महिला पोलिसाने ते पैसे थेट पॅन्टच्या मागच्या खिशात ठेवायला सांगितले. संबंधित तरुणीने हे पैसे महिला पोलिसाच्या खिशात ठेवले.

हा सगळा प्रकार एकाने कॅमेऱ्यात कैद केला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तातडीने कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. आम्ही वरिष्ठांकडे रिपोर्ट पाठवला आहे. त्यावर काय कारवाई होईल, हे वरिष्ठच ठरवतील, असे पिंपरी वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी याबाबत बोलताना सांगितले.

व्हिडिओच्या आधारे संबंधित महिला कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी अंतर्गत चौकशी करण्यात येणार असून घटनास्थळी नेमकं काय घडलं, याची पडताळणी केली जाईल, असे पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी सांगितले.


शेअर करा